

Space Economy Investment
esakal
नव्याने आलेल्या स्पेसएक्सच्या आयपीओने भांडवली बाजारात अभूतपूर्व उत्सुकता निर्माण केली आहे. गुंतवणूकदारांनी दिलेली किंमत ही आधुनिक भांडवलशाहीतील अपेक्षा आणि विश्वास यांचे नवे रूप स्पष्ट करते. त्या पार्श्वभूमीवर स्पेसएक्सचे मूल्यांकन, एलॉन मस्क यांच्यावरील विश्वास आणि अंतराळ अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील शक्यता यांचा एकत्रित विचार करताना, हा आयपीओ आगामी औद्योगिक युगाची दिशा दर्शवणारा संकेत ठरतो.
नव्याने आलेल्या स्पेसएक्सच्या आयपीओला प्रचंड मूल्यांकन मिळत आहे. ते केवळ एका कंपनीचे आर्थिक मूल्यांकन नसून, शेअर बाजाराच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचेच एक ठळक उदाहरण मानता येते. शेअर बाजार ‘भविष्याकडे पाहून किंमत ठरवतो’ या तत्त्वाचे स्पष्ट प्रतिबिंब त्यात दिसत आहे. या उद्योगाची संपूर्ण परिसंस्था अद्याप उभी राहायची आहे; मात्र त्याची एक झलक दिसताच त्याला मोठे मूल्य दिले जात आहे.
मीडिया अहवालांनुसार, स्पेसएक्सने अभूतपूर्व अशा ७५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारला. गुंतवणूकदारांनी त्यासाठी उपलब्ध शेअरच्या चार पट म्हणजे अडीचशे अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या बोली लावल्या होत्या. शेअरचे व्यवहार सुरू झाल्यावर त्यांचे एकूण मूल्यांकन एक लाख ७७ हजार कोटी डॉलर एवढे झाले. नंतर ते दोन लाख कोटी डॉलरपर्यंत गेले. या प्रक्रियेत एलॉन मस्क हे जगातील पहिले लक्षकोट्यधीश अर्थात ट्रिलियनियर ठरले.
एखाद्या शेअरला चार पट मागणी येणे हे सामान्य आहे. उदाहरणार्थ, एका नाट्यगृहात शंभर आसने असतील; तर एखाद्या नाटकाची तिकिटे ४०० प्रेक्षकांनी मागणे असा त्याचा अर्थ होतो. स्पेसएक्सच्या शेअरला अशी मागणी आली होती. अर्थात ही जादा मागणी किंवा शेअरला मिळालेले मूल्य याहीपेक्षा, गुंतवणूकदारांचे मत महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार, स्वायत्त फंड, पेन्शन मॅनेजर आणि किरकोळ गुंतवणूकदार या सर्वांचे मत असे होते, की स्पेसएक्सच्या शेअरचे मूल्यांकन एवढ्या असामान्य वरच्या पातळीवर जाऊनही ते अत्यंत योग्य आहे. त्यामुळे आयपीओपेक्षाही एक मजेदार प्रश्न उभा राहिला आहे.