
स्पेनचा अपघात आपल्याला पुन्हा खनिज इंधनांकडे जाण्याची उलटी वाट चालायला सांगत नसून नवीकरणीय ऊर्जास्रोतांच्या बलस्थानांवर आधारित नवी ऊर्जाप्रणाली उभी करायला सांगतो आहे.
स्पे नमध्ये २८ एप्रिलला अचानक विद्युतजाळ्यात बिघाड निर्माण होऊन चोवीस तास वीजपुरवठा खंडित झाला. स्पेन व पोर्तुगालमधील लाखो लोकांना याचा फटका बसला. गेल्या दोनेक दशकांत युरोपातील देशांनी नवीकरणीय ऊर्जास्रोतांची कास धरली आहे. त्यामुळे स्पेनच्या विद्युतनिर्मितीत आता जवळजवळ ६० टक्के वाटा सौर व पवनऊर्जेपासून विद्युतनिर्मितीचा आहे. यातले एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे नवीकरणीय स्रोतांपासून ऊर्जा सातत्याने सारख्याच प्रमाणात उपलब्ध नसते. त्यामुळे वीजनिर्मितीतही चढउतार होत रहातात, आणि एकाच वारंवारितेने व विद्युतभाराने स्थिर विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी वीजनिर्मिती आपल्याला हवी तशी कमी जास्त करता येईल, अशा स्रोतांपासून निर्माण केलेल्या विजेचा एक पायाभूत प्रवाहही विद्युतजाळ्यात ठेवावा लागतो. स्पेनमध्ये हा पायाभूत विद्युतप्रवाह अणूऊर्जा केंद्रे आणि जलविद्युत निर्मिती केंद्रे पुरवतात. ही सर्व यंत्रणा संगणकांद्वारे नियंत्रित केलेली असते.