esakal | संत तुकारामांचे अंधश्रद्धाविषयक विचार
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Tukaram}

संत तुकारामांचे अंधश्रद्धाविषयक विचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डॉ. ताहेर एच. पठाण

संत ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी संत तुकारामांनी केली. स्त्री-शूद्रादिकांच्या आध्यात्मिक उन्नतीचे जे ध्येय संत ज्ञानेश्वरांनी आपल्यापुढे ठेवले होते, ते तुकारामांच्या रूपाने प्रत्यक्षात अवतरले. लोकांना सरळ उपदेश करण्यापेक्षा भक्तीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना ज्ञानाचे डोस पाजले.

व्यावहारिक दृष्टांतांना काव्यात स्थान देऊन त्यांनी जीवनानुभवाचे सार व्यक्त केले. तुकारामांची गाथा आजही अभ्यासकांना आव्हान देणारी ठरली आहे. अंधश्रद्धा, नीतिमूल्ये, कन्यादान पद्धती, नवस, ढोंगी साधू, परद्रव्य, परनारी, जातिव्यवस्था, व्यसनाधीनता, जनकल्याण, वैज्ञानिक दृष्टिकोन, समानता, पर्यावरण आदी सर्वच विषयांचा ऊहापोह तुकारामांनी आपल्या अभंग-गाथेतून केला आहे. या लेखात संत तुकारामांच्या अंधश्रद्धाविषयक विचारांचा वेध घेण्यात आला आहे.

जेथे माणसाचा आत्मविश्वास संपतो, तेथून अंधश्रद्धेचा आरंभ होतो. विवेक, तारतम्य, कार्यकारण भाव आणि आत्मविश्वास यांचा अभाव माणसाला अंधविश्वासाकडे घेऊन जातो. अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला कलंक आहे. सर्वच संतांच्या प्रबोधनानंतरही समाजावरील अंधश्रद्धेचा प्रभाव दूर होऊ शकलेला नाही. धूप, अंगारा, लिंबू, मंतरलेले पाणी आजच्या विज्ञान युगातही अनेक समस्यांवरील उपाय म्हणून समाजाला मान्य आहे.

भोंदूबाबांकडे आजही दु:खी, कष्टी, आजारी माणसांची गर्दी वाढलेली दिसते. मानसिकदृष्ट्या दुर्बल असणारा समाज भोंदूबाबांच्या सोंगाला नेहमीच बळी पडून कोंबडी, बकरे, मटण देणारे; एवढेच नाही तर स्वत:च्या मुलाचा बळी देणारे महाभाग आजच्या काळातही दिसतात. ‘नव्हे जाखाई जोखाई। मायराणी मेसाबाई।। बळिया माझा पंढरीराव।’ जाखाई, जोखाई, रंडी, चंडी आदी शूद्र देवतांना मांस, मटण यांसारख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची अघोरी पद्धत होती व आजही आहे. गळ्यात कवड्याची माळ घालणारे, माथ्यावर शेंदूर फासणारे, लोकांना लुबाडणारांवर प्रहार करत, देवाचा देव-पांडुरंगाची प्रेमपूर्वक आराधना करावी असा उपदेश ते करतात.

समाजात चाललेली अंधश्रद्धा तुकारामांना मुळीच मान्य नव्हती. समाजातील ढोंगीपणावर, अंधश्रद्धेवर टीका करताना संत तुकाराम म्हणतात, ‘‘यंत्र मंत्र काय करिसी जडीबुटी । तेणे भूतसृष्टी पावशील ।।’’ यंत्रतंत्रामुळे आपली इच्छा पूर्ण होते हा समज अंधश्रद्धेचे द्योतक आहे. संतपणाचा आव आणून भोळ्याभाबड्या बाया बापड्यांना फसविणाऱ्या लबाड संन्याशांपासून ते समाजाला सावध करतात.

नवस-सायासादी प्रकारालाही संत तुकारामांनी प्रखर विरोध केला आहे. ‘नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती’? म्हणजेच अशा देवतांच्या मागे लागून, त्यांना नवस करून जर कन्या-पुत्र होतात तर कशासाठी पती करावा लागतो असा रोख-ठोक सवाल ते करतात. सेंदरा-दैवतांना नवस करणे, अंगात देवाचा संचार होणे व अंगात वारे येणे हे तुकारामांना अजिबात मान्य नाही. अंगारा, धुपारा हे करणारे भक्त नाहीत तर फसवेगिरी करणारे भोंदू आहेत.

तत्कालीन कालखंडामध्ये समाज अंधश्रद्धा, रूढी, दैववादी भूमिकेमध्ये गुंतला होता. तुकारामांचे अभंग पुरोगामी विचारांनी ओतप्रोत भरलेले आहेत. त्यांनी अनेक अभंगांतून कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा यांवर घणाघाती प्रहार करून दैववाद व निराशावादाचा धिक्कार केला व प्रयत्नवाद व आशावादाचा पुरस्कार केला. अतिशय परखड असे त्यांचे विचार होते.

संत तुकारामांनी समाजचिंतन करून समाजातील अन्याय, अत्याचार, अनाचार व दांभिकता यांची वास्तविकता पटवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी समाजातील साधूपणाचा, संतपणाचा आव आणणाऱ्या दुष्ट लोकांचा खोटेपणा जगासमोर उघड केला. या काळामध्ये धर्म, भक्ती, ज्ञान, कर्म, पूजा इ. खरे स्वरूप समजून न घेता, अनेकांनी स्वार्थासाठी, अज्ञानाने व अपूर्ण ज्ञानाने समाजातील अध्यात्मामध्ये ढवळाढवळ केली. अशा दांभिक, भ्रष्ट लोकांवर तुकारामांनी कडाडून हल्ला केला. जातिभेदापेक्षा माणसांच्या गुणांना अधिक महत्त्व दिले. जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था यांमध्ये गुंतण्यापेक्षा सर्वांना एकत्रित बांधणारा विठ्ठलभक्तीरूपी धागाच त्यांनी महत्त्वाचा मानला आहे.

स्वातंत्र्य, समता, सहिष्णुता, बंधुभाव, सदाचार, नीतिमूल्यांची पेरणी केली. समाजातील न्यूनगंड, भयगंड यांतून समाजाची मुक्तता करून त्यांच्यात आत्मविश्वास पेरला. त्यांना लोकोद्धाराची तळमळ, समाजातील दु:खी, अज्ञानी लोकांविषयी कमालीची आस्था होती. ‘बुडती हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया।।’ या अभंगातील समाजाविषयीची भावना त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देते.