

Special Children Art
esakal
अरविंद हाटे - arvindhate@yahoo.com
विशेष गरजा असलेली मतिमंद आणि गतिमंद मुले म्हणजे समाजातील अत्यंत संवेदनशील अन् निरागस घटक... अनेकदा शब्दांतून भावना व्यक्त करणे त्यांना कठीण जाते. मात्र, रंग, रेषा आणि आकृत्यांच्या माध्यमातून ती सहजपणे स्वतःचे भावविश्व मांडतात. म्हणूनच चित्रकला ही त्यांच्यासाठी केवळ कला नसून संवादाचे, आत्मअभिव्यक्तीचे आणि आनंदाचे प्रभावी माध्यम ठरते. मानवाच्या भावना, विचार आणि कल्पनाशक्ती व्यक्त करण्यासाठी कला हे प्राचीन काळापासून महत्त्वाचे माध्यम राहिले आहे. विशेषतः चित्रकला मनातील भावना थेट व्यक्त करते. या मुलांच्या चित्रांमध्ये निरागसता, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि त्यांच्या अंतर्मनातील भावविश्व अत्यंत हृदयस्पर्शीपणे उमटताना दिसते.
अनेकदा अशी मुले आपली भावना शब्दांत सांगू शकत नाहीत. आनंद, भीती, एकटेपणा, प्रेम, उत्सुकता किंवा अस्वस्थता त्यांचे चित्र व्यक्त करतात. रंगीबेरंगी आकाश, फुलपाखरू, घर किंवा आई-वडिलांचे चित्र त्यांच्या अंतर्मनाची झलक दाखवते. तांत्रिक परिपक्वतेपेक्षा त्यांच्या चित्रांमध्ये निरागसता, स्वच्छता आणि प्रामाणिक भावना दिसतात. मतिमंद व गतिमंद मुलांचे शिकणे आणि संवाद वेगळ्या पद्धतीने होतो. त्यांच्यात भावनांचे, स्वप्नांचे आणि कल्पनाशक्तीचे विशाल विश्व असते आणि ते व्यक्त करण्यासाठी चित्रकला अत्यंत उपयुक्त आहे.