

Stablecoins
esakal
स्टेबलकॉइन्स केवळ डिजिटल चलन नसून डॉलरच्या साम्राज्यवादाचे नवे हत्यार होऊ पाहत आहेत. क्रिप्टोच्या पडद्याआड अमेरिकन आर्थिक मुत्सद्देगिरीचा आणि भू-राजकीय धोक्यांचा नवा डाव आकार घेत आहे. हा अमेरिकेच्या रणनीतीचा भाग बनल्यापासून स्टेबलकॉइन्सचा झपाट्याने विकास झाला आहे. दहा वर्षांच्या संथ वाढीनंतर २०२५मध्ये त्यांनी अचानक २०० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठला असून, क्रिप्टो व्यवहारांमध्ये स्टेबलकॉइन्सचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
‘‘बऱ्याचदा अनेक दशकांत काहीच घडत नाही, पण काही आठवड्यांत दशकांचा इतिहास घडतो,’’ असे लेनिनने सांगितल्याचे म्हटले जाते. हे खरोखर त्याचेच शब्द आहेत काय, हा वादाचा विषय असला, तरी क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या प्रभावाला हे विधान तंतोतंत लागू पडते. जागतिक अर्थव्यवस्थेत चलनाच्या बदलत्या स्वरूपाच्या केंद्रस्थानी आहेत स्टेबलकॉइन्स. आता मात्र अमेरिकेसाठी हे केवळ तांत्रिक खेळणे किंवा प्रयोग नसून आर्थिक शस्त्र ठरत आहेत. अमेरिका स्टेबलकॉइन्सकडे आपले आर्थिक वर्चस्व, डॉलरचा दबदबा आणि कर्जबाजारीपणाला अर्थबळ टिकवण्यासाठीचे एक साधन म्हणून पाहत आहे.