
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
आपल्या संविधानाने शोषणाविरोधी अधिकार दिला, त्यासाठी निरनिराळे कायदेही बनवले गेले. यंत्रणाही उभ्या केल्या; परंतु ही सर्व व्यवस्था गुलामी नष्ट करण्यात प्रत्यक्षात पराभूत झालेली आम्हाला स्पष्टपणे दिसत होती. देपिवलीच्या शिबिरात जो एक एक जबाब आम्ही ऐकत होतो, ती केवळ त्या वेठबिगारांच्या गुलामीची कहाणी नव्हती; तर स्वातंत्र्याच्या तीस वर्षांच्या पराभूत यंत्रणेची ती साक्ष होती. आम्ही एकामागून एक जबाब घेत होतो. त्यावरून असं लक्षात आलं, की काही मालकांनी वेठबिगारांना शिबिराला यायला बंदी केलेली होती. मेढ्या गावातल्या वेठबिगारांना मालक येऊ देत नव्हते. मग आम्ही असा निर्णय घेतला, की विद्युल्लताने शिबिरात जबाब लिहिणं चालू ठेवावं आणि मी मेढ्याला जावं. मी नाऊ, अनंता वाडू, विष्णू घाटाळ यांना सोबत घेतलं. कुणी मला ओळखू नये म्हणून, मी अर्धी विजार आणि बनियन एवढेच कपडे घातले होते. भूक भागवण्यासाठी खिशात बटाटे ठेवले होते. टेम्पोत बसून आम्ही मेढ्याच्या दिशेने निघालो.