Student Support Committee
esakal
विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य गेली ७० वर्षे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सुरू आहे. डॉ. अच्युतराव आपटे यांनी आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९५५मध्ये पाच विद्यार्थ्यांची घरोघरी वाराने जेवणाची सोय करण्यापासून या कार्याला सुरुवात केली. त्याचा आता विस्तार झाला आहे. समितीमुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांच्या जीवनात परिवर्तन झाले. अतिशय विश्वासाने जोडलेले देणगीदार, निःस्पृह कार्यकर्ते, कृतज्ञतेतून संस्थेला वेळ देणारे माजी विद्यार्थी अशा त्रिवेणी संगमातून संस्था प्रगतीचा एक एक टप्पा पुढे जात आहे. या संस्थेशी आणि विधायक कार्याशी ५०हून अधिक वर्षे जोडलेला असणे, हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे.
समितीत ग्रामीण भागातून उच्चशिक्षणासाठी आलेल्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना केवळ अल्पदरात निवास-भोजनाची सुविधा दिली जात नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पहाटे अर्धा तास योगासने, रोज अर्धा तास श्रमदान, कमवा आणि शिका योजनेतील सहभागातून आपला खर्च भागवणे, महिन्यातून एकदा देणगीदार पालकांशी संवाद या गोष्टी अनिवार्य आहेत. विद्यार्थी विकास केंद्रामार्फत विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्याने, अभ्यास सहली, उपक्रमांत थेट सहभाग यांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, सभाधीटपणा येतो. समितीत विद्यार्थी व्यवस्थापन आहे. वसतिगृहनिहाय साधारण २५-३० विद्यार्थ्यांकडे दैनंदिन उपक्रमांच्या विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यातून त्यांचा नेतृत्वविकास घडतो. अशा अनौपचारिक शिक्षणातून या वयोगटातील विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याने ते शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यावर एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरतात, हे अभिमानाने नोंदवावे लागेल.