esakal | सुनंदाचे जीवन म्हणजे 'कापूस कोंड्याची गोष्ट'!
sakal

बोलून बातमी शोधा

sunanda salodkar}

सुनंदाचे जीवन म्हणजे 'कापूस कोंड्याची गोष्ट'!

sakal_logo
By
चंद्रकांत श्रीखंडे

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव या छोट्याशा गावात राहणारी कर्तृत्ववान तरुणी म्हणून सुनंदा सालोडकर (जाधव) यांचे नाव सध्या गाजत आहे. सुनंदाची गोष्ट रोमांचक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत समाजातील महिला वर्गासमोर सुनंदाने आदर्श ठेवला. ती एका पडक्या झोपडीत राहत होती. मात्र, आज प्रचंड इच्छाशक्ती, कतृत्वाच्या बळावर ती यशस्वी ठरली आहे.

सुनंदा ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी. वयाच्या १५ व्या वर्षी सुनंदाच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला. अचानकपणे वडिलांच्या मृत्यूने डोक्यावरचे छत्र हरपले. सोबत आई व चार बहिणी असा व्याप. कुटुंबप्रमुख गेल्याने सन १९९७ साली अख्खे कुटुंब वाऱ्यावर आले. परंतु, सुनंदाने आलेल्या संकटाला न डगमगता वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभर चिंतन-मनन करून या पुरुषप्रधान समाजात आपणही मागे नाही, हे दाखवून दिले. समाजाची कुठलीही पर्वा न करता १९९८ साली त्यांच्याच शेताच्या शेजारी असलेल्या ॲड. केशवानंद रोडे यांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ असलेल्या शेतावर स्वतः बहिणींना सोबत घेऊन राबायला सुरुवात केली. सुनंदाकडे आज ६ एकर शेतजमीन असून आज ती आधुनिक पद्धीतीची सेंद्रिय शेती करत आहे.

आधी बहिणींचे लग्न, मग स्वतःचे -

सेंद्रीय शेतीतून दरवर्षी सोयाबीन, गहू, हरभरा, भाजीपाल्याचे उत्पादन घेते. याचबरोबर सुनंदाने शेतीचा विकासही केला आहे. त्यात संत्रा, मोसंबी अशा फळांचे देखील उत्पन्न घेते. गावठी कुक्कुटपालन, शेळीपालन, असे अनेक शेतीपूरक उद्योग तिने सुरू केले आहे. दरवर्षी या माध्यमातून ३ लाखांचे उत्पादन घेते. स्वतः लग्न न करता दोन बहिणींचे आधी लग्न करून दिले. सर्व बहिणींची जबाबदारी पार पडल्यानंतर मी लग्न करेन, असा पवित्रा तिने घेतला होता. त्यानुसार तीने २०१७ ला सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण तेजपाल जाधव यांच्याशी विवाह केला. सद्यस्थितीत तेजपाल आणि सुनंदा दोघेही सोनेगावातील शेतात राबतात.

सुनंदाला मिळालेले पुरस्कार -

कर्तृत्ववान कामगिरीबद्दल अनेक ठिकाणी आदर, सत्कार, मानसन्मानही त्यांना प्राप्त झाला. सुनंदाला सन २००९ मध्ये मुबंई येथे वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, २०१२ मध्ये अण्णासाहेब शिंदे बळीराजा पुरस्कार, तर २०१३ ला महिंद्रा अँड महिंद्राकडून कृषि पुरस्कार प्राप्त झाला होता. नुकताच यावर्षी २०२१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार प्राप्त झाला. सुनंदाच्या संपूर्ण कार्याची मराठी चित्रपट सृष्टीने दखल घेत सन २०१४ मध्ये निर्माता नितीन भोसले यांनी सुनंदावर ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हा चित्रपट काढला व तो राज्यभर प्रदर्शित झाला.

go to top