

Theatre Artist Success Story
esakal
अलीकडेच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नव्या पर्वात अंबरनाथचा सुकृत देव सहभागी झाला. या शोमध्ये त्याने एक शायरी सादर केली. त्या शायरीच्या आशयाला वास्तव वाटणाऱ्या अभिनयाची, देहबोलीची आणि त्या व्यक्तिरेखेला साजेशा आवाजाची बेअरिंग जोडली. सादरीकरणासाठी त्याच्या नावाची घोषणा झाल्यावर तो प्रेक्षकांतून उठला आणि मंचाकडे निघाला त्याचे कॅरेक्टर घेऊनच. त्याच्या एंट्रीपासून ते परीक्षकांच्या सवाल-जवाबांपर्यंत त्यात दिसली ती त्याच्या रंगमंचीय सादरीकरणाची नशा. त्याच नशेने त्याचा परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला आणि तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला.
सुकृत देवचा शोदरम्यान परीक्षकांशी झालेला संवाद ऐकला की जाणवते, हा कलाकार फक्त अभिनय करत नाही; तर त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होतो. त्याचे उत्तर हे पटकथेतले संवाद नाही; तर तो आयुष्यात आलेल्या अनुभवांचाच हजरजबाबीपणा वाटतो. आलिया भट्टने सुकृतला विचारले, ‘आप ॲक्टिंग कर रहे हो ना?’ त्यावर तो म्हणाला, ‘मैं जित गया! अगर आपको लगा की मैं सच में पिया हू।’ या उत्तराने सोशल मीडियावर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते उत्तर व्हायरल झाले; पण त्यामागे आहे त्याची तपस्या, त्याची रंगभूमीशी असलेली निष्ठा, कडक शिस्त, कठोर तालीम आणि थिएटरविषयीची कमालीची संवेदनशीलता...
रातोरात स्टार होणे, ही आजच्या सोशल मीडियाच्या काळातील सर्वांत मोहक कल्पना आहे. एका व्हिडिओने आयुष्य बदलते, एका परफॉर्मन्सने लाखो फॉलोअर्स मिळतात आणि एका मंचावर उभे राहिल्यावर देशभरात ओळख निर्माण होते; पण या ‘एका रात्री’च्या मागे अनेक वर्षांच्या अंधाऱ्या रात्री असतात, प्रेक्षागृहातील रिकाम्या खुर्च्या असतात, टाळ्यांपेक्षा जास्त वेळा मिळालेली शांतता असते आणि तरीही स्वतःच्या कलेवर अढळ विश्वास असतो. तोच विश्वास सुकृतने सार्थ ठरवला आहे.