
लालबत्ती हिरवी झाली आली कोकणगाडी
आली कोकणगाडी दादा आली कोकणगाडी
वसंत बापट यांची ही कविता प्रत्येक कोकणी माणसाच्या काळजाचा ठाव घेणारी आहे. कोकण रेल्वे सुरू झाली त्या ऐतिहासिक क्षणाचे हे शब्दचित्र. ‘कोकणगाडी’ ही फक्त रेल्वेगाडी नाही. ती आशा होती गतिमान विकासाची, भव्य स्वप्नांची आणि उज्ज्वल भविष्याची! मात्र, आज खरा प्रश्न असा आहे, की कोकण रेल्वेच्या तीन दशकांच्या प्रवासानंतर विकासाची ही ‘गाडी’ खरोखर कोकणात पोहोचली का? हा प्रश्न आत्ताच का उद््भवतो आहे, तर त्याचं कारण म्हणजे वर्तमानपत्रांत झळकलेला मथळा - ‘कोकणाचा विकास महायुतीच्या अजेंड्यावर!’ किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन सोहळा पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही घोषणा गाजली.