

BSF 1971 War Role
esakal
भारतीय संरक्षण दलांनी त्यांच्या समर्पणाने लिहिलेला इतिहास आठवत १६ डिसेंबर १९७१ हा दिवस आपण ‘स्वर्णीम विजय दिवस!’ म्हणून साजरा करतो. बांगलादेश स्वतंत्र झाला. ९३ हजार एवढ्या प्रचंड संख्येने पाकिस्तानी सैन्याने या युद्धात शरणागती पत्करली. भारतीय सैन्याच्या असीम धैर्याची आणि अपरिमित निष्ठेची ही गाथा म्हणजे पराक्रमाची धगधगता मशाल! हे युद्ध ३ ते १५ डिसेंबरदरम्यान घडलं, मात्र त्याची सुरुवात खूप आधी झाली होती. मार्च ते डिसेंबर असे ९ महिने आत्यंतिक कळा सोसून बांगलादेशाचा जन्म झाला. हा कालावधी भारतीय सैन्यासाठी, विशेषतः सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) फार मोठ्या संघर्षाचा ठरला. या काळातल्या अघोषित युद्धात मोठी वेदना त्यांनी सहन केली. यामुळे नंतर झालेल्या पाकिस्तानी आक्रमणाला यशस्वीरीत्या तोंड देत विजयाचा इतिहास रचला गेला. या विजयात ‘बीएसएफ’चं मोठं योगदान आहे.
भारताच्या तीन मुख्य सैन्य दलांबरोबर अनेक निमलष्करदलेही कार्यरत आहेत. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी केंद्रीय पातळीवरची ही दले सीमासुरक्षेसाठी तेवढ्याच ताकदीने लढतात. त्यांनी वेळोवेळी मोठा इतिहास रचला आहे. नुकताच १ डिसेंबर रोजी आपण सीमा सुरक्षा दलाचा (बीएसफ) स्थापना दिवस साजरा केला. त्यांचं आजवर मोठं योगदान आहेच. विशेष म्हणजे, १९७१ चं भारत- पाकिस्तान युद्ध!