

Technological advancement
esakal
विवेक सुतार
‘उसने अवसान आणणे’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय आज भारताच्या कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील वाटचालीकडे पाहताना प्रकर्षाने येतो. ‘युपीआय’चे यश आणि खिशातून दिमाखात काढले जाणारे ‘क्यूआर कोड’ हे आपल्या डिजिटल प्रगतीचे लक्षण वाटत असले तरी, वास्तवाचा पडदा बाजूला सारल्यावर लक्षात येते की आपण ज्या तंत्रज्ञानाच्या लाटांवर स्वार आहोत, त्या आपल्या मालकीच्या नाहीत. सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय तरुणांनी गाजवलेले कर्तृत्व पाहून आपण कौतुक करतो; पण ज्या पायाभूत सुविधांच्या आधारावर हे ‘दिवे’ जळत आहेत, ती कोठी आपली नाही हे आपण सोयीस्कर विसरतो.
भारताने ‘एआय’ क्रांतीसाठी मोठी तयारी करायला हवी. आपण अद्याप सज्ज नाही, हे सत्य पचवणे कडू असले तरी ते अपरिहार्य आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि त्याचे खरे मालक असणे यातील मूलभूत फरक विसरलो आहोत. जगाचा नकाशा आज सिलिकॉनच्या अतिसूक्ष्म तंतूंनी नव्याने रेखाटला जात असला तरी या नकाशावर भारताचे अस्तित्व ठळक होण्यापूर्वीच ते पुसले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आजच्या जगात बुद्धिमत्ता हा औद्योगिक कच्चा माल राहिलेला नसून ते एक राजकीय आणि धोरणात्मक शस्त्र बनले आहे. केंद्राला ‘युपीआय’ आणि ‘आधार’च्या यशामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास असला तरी, विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिले तर एआय महासत्ता होण्याचे स्वप्न सध्यातरी मृगजळ वाटते. खरा प्रश्न किती भारतीय ‘एआय’ वापरतात हा नसून, जेव्हा जागतिक पुरवठासाखळी विस्कळीत होईल किंवा ‘क्लाउड सेवा’ राजकीय सौदेबाजीचा भाग बनेल, तेव्हा या यंत्रणा चालवण्याचा सार्वभौम अधिकार कोणाकडे असेल, हा आहे.