Premium|Tadoba Wildlife Conservation : हरणाला वाचवण्यासाठी शहनाझने घेतली धाव; ताडोबाच्या जंगलाशी असलेलं अनोखं नातं

Tadoba Wildlife Conservation : ताडोबाच्या जंगलाशी घट्ट नातं जोडलेल्या शहनाझचा वन्यप्राण्यांबद्दलचा जिव्हाळा, हरणाला वाचवण्याचा अविस्मरणीय अनुभव आणि जंगल संवर्धनासाठी गाइड म्हणून केलेले काम.
Tadoba Wildlife Conservation

Tadoba Wildlife Conservation

esakal

Updated on: 

वर्षा जोशी-आठवले

‘‘गाइड झाल्यावर गावकऱ्यांनी पहिली तीन वर्षं छळ केला, पण नंतर मात्र नाही. आता कोणताही निर्णय घ्यायचा तर ते आम्हालाही सोबत घेतात, संघटनेतही घेतलंय आम्हाला आता. मला माझ्या घरात म्हणजे ताडोबातच रोज यायला मिळतंय, याचा आनंदच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. माझ्या जंगलासाठी मला काहीतरी करायला मिळत आहे, हे महत्त्वाचं!’’ शहनाझच्या तिच्या घरावरच्या या प्रेमानं थक्क व्हायला झालं...!

‘‘माझं त्यावेळचं वय आठवत नाही, थोडी कळत्या वयातली असेन कदाचित. पण तो प्रसंग आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो! जंगलाच्या पुढे सहा-सात किलोमीटरवर गाव होतं. त्यामुळे गावातल्या कुत्र्यांचाही जंगलात वावर असे. एरवी कुत्र्यांचा त्रास नसायचा, पण ही कुत्री काही वन्यप्राण्यांवर हल्ला करायची. त्यातही स्पॉटेड डिअरवर नेहमीच हल्ला होत असे. एकदा मी आणि माझा भाऊ नेहमीप्रमाणे जंगलातून जात होतो. आसपास हरणं वगैरे होतीच. त्यातल्याच एका हरणाचा या कुत्र्यांनी पाठलाग सुरू केला. स्पॉटेड हरीण जिवाच्या आकांतानं पळतंय आणि कुत्रीही जीव खाऊन त्याचा पाठलाग करताहेत, हे दृश्य बघून आमचंही भान हरपलं होतं. शेवटी कुत्र्यांनी त्या पूर्ण वाढ झालेल्या हरणाला पकडलंच. त्याच्यावर हल्ला केला. हरीण त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होतं, पण कुत्री त्याला घेराव घालून ओरबाडत होती. हरीण जखमी झालं. त्या हरणाला आता वाचवायलाच हवं होतं. म्हणून मग मी भावाला सांगितलं की तू जाऊन वडिलांना घेऊन ये, त्या हरणाला वाचवू आणि घरी घेऊन जाऊ. आमचं घरच जंगलात असल्यामुळे आमच्या अंगणातही हरीण, सांबर असे अनेक वन्यप्राणी यायचे. तिथंच राहायचेही ते. वडील येईपर्यंत कुत्र्यांना हाकलून मी त्या हरणाच्या पाठीवर बसले. कुत्री थोडी दूर गेली. वडील आणखी दोन-चारजणांना घेऊन आले. माणसांचा आवाज आल्यानं हरीण घाबरलं आणि जंगलाच्या दिशेनं धावायला लागलं. पाठीवर मी होतेच. धरून बसायला काहीच नाही. त्याच्या वेगामुळे अर्थातच थोड्या वेळातच मी खाली पडले. पुन्हा एकदा कुत्री त्या हरणाच्या मागे लागली. परत कुत्र्यांना हाकललं आणि त्या हरणाला कॉलनीत घेऊन आले. तेल-हळद लावून त्याला बरं केलं आणि पुन्हा जंगलामध्ये सोडून दिलं. या सगळ्या प्रसंगामध्ये मलाही खूप लागलं. पण हरणाला वाचवू शकले याचं समाधान मिळालं. हा प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय झाला...’’ शहनाझ भरभरून सांगत होती.

शहनाझ बेग. ताडोबाच्या जंगलात राहणारी एक स्थानिक. लहानपणापासूनच ताडोबा हेच तिचं घर. त्यामुळे तिथला प्रत्येक वन्यप्राणी तिच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याप्रमाणेच होता. पुढे जंगल सुटलं, घर मागं राहिलं. मात्र आपल्या घरी, जंगलात पुन्हा जायला मिळावं म्हणून शहनाझनं कार्यक्षेत्रच आगळंवेगळं निवडलं. ते काम होतं जंगल सफारीच्या गाइडचं! शहनाझच्या मनात गाइड व्हावं असं आलं तेव्हा परिस्थिती अशी होती, की तोपर्यंत परिसरातल्या कुठल्याच महिलेनं गाइडचं काम केलं नव्हतं. त्यामुळे टीका, त्रास, छळ, संघर्ष, आव्हान, परीक्षा अशा सगळ्याच समस्यांना तिला सामोरं जावं लागलं. त्या शहनाझ बेगची ही कहाणी.

पुरुषांच्या क्षेत्रात बाईनं पाय रोवून उभं राहणं आता अवघड नाही असं चित्र शहरी वातावारणात दिसू लागलं असलं, तरी काही क्षेत्रं अशी आहेत की जिथं आजही स्त्रियांना फारसा वाव मिळू दिला जात नाही. असंच एक क्षेत्र म्हणजे जंगल सफारीचा गाइड. २०१०पर्यंत जंगल सफारीला फक्त पुरुष गाइड असायचा. मात्र शहनाझसारख्या एका बाईनं गाइड व्हायचं मनावर घेतलं आणि पुढे घडला तो इतिहास!

शहनाझचं नाव आणि तिच्या कामाविषयी कानावर आलं, तेव्हा तिच्याशी बोलण्याची उत्सुकता गप्प बसू देईना. शेवटी फोन केला आणि शहनाझचा ठाम, आत्मविश्वासपूर्ण आवाज कानावर पडला. आमच्या दोघींच्या वेळा जमवता जमवता अवघड गेलं खरं, पण शेवटी वेळ जमून आल्यावर छान तासभर गप्पा रंगल्या. त्या गप्पांचाच हा लेखाजोगा.

Loading content, please wait...