
जगाच्या सामरिक आणि अर्थकारणावर तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असल्याच्या आजच्या कालखंडात तैवान अन्य देशांशी संबंध विस्तारतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी (एआय) लागणाऱ्या चीप, वस्त्रोद्योगातले अत्यंत नावीन्यपूर्ण बदल, पादत्राणे निर्मिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विद्यापीठांची भक्कम बांधणी या बळावर नव्या संबंधांचा विचार करीत आहे. भारत आणि महाराष्ट्राबरोबर तैवानचे व्यापार संबंध वृद्धिंगत होण्याच्या अनेक संधी आहेत. तैवानच्या परराष्ट्र खात्यानं आयोजित केलेल्या पत्रकारांच्या दौऱ्यात सहभागी होऊन घेतलेला हा सर्वंकष आढावा...
सेमिकंडक्टर क्षेत्रात आज दिसणाऱ्या तैवानच्या श्रेष्ठत्वामागं चाळीस वर्षांची अखंड मेहनत आहे. सेमिकंडक्टर क्षेत्रात आज तैवान सर्वोत्तम आहे, म्हणून कोणी स्वस्थ बसलेलं नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आत्ताशी कुठं सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या ‘चीप’वर सातत्यानं संशोधन सुरू आहे. आज जगातल्या ‘एआय’साठीच्या शंभर टक्के ‘चीप’ तैवानच्या आहेत. उद्याही त्या राहिल्या पाहिजेत, असा आजच्या संशोधनाचा हेतू आहे,’’ तैवानच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे एक ज्येष्ठ अधिकारी सांगत होते.