
वॉल्टर स्कॉट
तमिळनाडूत विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये आहे. राज्यातील पक्षांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गणिते जुळवण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता विजयच्या राजकारण प्रवेशानेही समीकरणे बदलणार आहेत. विरोधी पक्षांनी बहुरंगी लढतींची शक्यतेने आघाड्या करण्यासाठी राजकीय दिशाबदलास सुरुवात केली आहे.
लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत तामिळनाडूतील सर्व ३९ जागा आणि शेजारच्या पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील एकमेव जागा जिंकून द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने निर्विवाद बाजी मारली. परंतु राज्यातील सत्तेत वाटा मागणाऱ्या त्यांच्या मित्रपक्षांच्या अपेक्षांबाबत द्रमुकने मौन राखले आहे. त्यातच २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ठसा उमटवण्याच्या एकमेव उद्दिष्टाने अभिनेता विजयने राजकारणात उडी घेतली आहे.
द्रमुकची आघाडी अबाधित असली तरीही मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि दलितांच्या 'व्हीसीके' आणि द्रमुकमध्ये अंतर निर्माण झाले आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष अण्णा द्रमुक अस्तित्वासाठी झगडत आहे. त्याने भाजपसाठी दरवाजे बंद केले आहेत. तर पक्षाचे ओ. पनीरसेल्वम, टी. टी. व्ही. दिनाकरन आणि व्ही. के. शशिकला यांनी पक्षाविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत.