

Sinhagad Fort History
esakal
सिंहगड म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा. तो न्यायासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची सतत प्रेरणा देतो. तानाजी मालुसरे आणि मावळ्यांच्या शौर्याने अन् रक्ताने सिंहगड पावन झालेला आहे. तेथील कणन् कण तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची, धैर्याची, त्यागाची, निर्भीडपणाची आणि निस्वार्थीपणाची पदोपदी आठवण करून देतो.
ण्याच्या नैर्ऋत्य दिशेला असणाऱ्या सिंहगडाला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे, याची साक्ष तेथील लेण्यांवरून मिळते. कौंडिण्य ऋषींच्या वास्तव्यावरून ‘कोंढाणा’ नाव प्रचलित झालं, अशी आख्यायिका आहे. देवगिरीच्या यादव राजाच्या साम्राज्यात कोंढाणा गडाचा समावेश होता. किंबहुना कोेंढाणा हा त्यांच्या साम्राज्याचा अविभाज्य भाग होता. कोंढाणा किल्ल्याचे बांधकाम यादव काळात झालेले आहे. नागनाईक हे कोळी सरदार कोंढाण्याचे किल्लेदार असताना महंमद तुघलकाच्या सैन्याने गडाला वेढा टाकला. तो सुमारे आठ महिने होता. नागनाईक यांनी आठ महिने किल्ल्याचे रक्षण केले. अखेर १३३० मध्ये तुघलकाने कोंढाणा ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला बहमणी, निजामशहा आणि आदिलशहाच्या ताब्यात गेला. १६४७ पर्यंत तो विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यनिर्मितीची शपथ घेतल्यानंतर आदिलशहाच्या ताब्यातील किल्ले जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये १६४८ मध्ये कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. शहाजीराजे शिवाजी महाराजांना स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात मदत करतात म्हणून आदिलशहाने त्यांना कैद केले. आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला १६४९ मध्ये आदिलशहाला दिला. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा कोंढाणा किल्ला जिंकून घेतला.
कोंढाणा किल्ल्याचे स्वराज्यनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान आहे. या गडाला कोकणचे प्रवेशद्वार म्हटले जाते. स्वराज्याच्या पिंडीवर बसलेल्या शाहिस्तेखानाला ठेचण्यासाठी शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ल्याने मोलाची साथ दिली. शाहिस्तेखानाला धडा शिकवून शिवाजी महाराज ५ एप्रिल १६६३ रोजी कोंढाणा गडावर पोहोचले. पुढे त्यांच्यात आणि मोगलांमध्ये पुरंदरचा तह (११ जून १६६५) झाला. त्या तहानुसार कोंढाणा किल्ला शिवाजीराजांनी मोगलांना दिला. आग्रा सुटकेनंतर शिवाजीराजांनी स्वराज्याची बांधणी केली. पुरंदर तहात मोगलांना दिलेले २३ किल्ले जिंकून घेण्याची मोहीम महाराजांनी हाती घेतली.