esakal | असे एक गाव..जे भारताला मिळून देते सुमारे दहा कोटीचे परकीय चलन !
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Banana Village}

असे एक गाव..जे भारताला मिळून देते सुमारे दहा कोटीचे परकीय चलन !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव जिल्ह्यातील केळी ही देशात नव्हे तर जगात प्रसिध्द आहे. त्यात केळी उत्पादक शेतकरी आधुनिक शेती करू लागल्याने या दर्जेदार केळीला परदेशातून मोठ्या प्रमाणातून मागणी असते. त्यातच अरब देशातून मोठी आहे. जिल्ह्यातून निर्यात केली जाणाऱ्या एकून केळी पैकी पन्नास टक्के केळी केवळ एका गावातून निर्यात केली जाते. सुमारे नऊ ते दहा कोटी रुपयांचे परकीय चलनातून उत्पन्न एकट्या गावातून भारताला मिळते.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तांदलवाडी हे गावाचे अर्थचक्र जवळपास शेती उत्पादनावर आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात सुमारे १०० ते १२५ शेतकरी आहे. त्यात सुमारे ३०० हेक्टरवर केळी केळीचेच उत्पादन या गावात घेतले जाते.

पन्नास टक्के निर्यात

जळगाव जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. त्यात तांदलवाडीत सुमारे ३०० हेक्टवर केळीचे लागवड केली जाते. आणि जिल्ह्यातील सुमारे ६०० कंटेरन केळी निर्यातपैकी एकट्या तांदलवाडीतून ३०० कंटेनर हे निर्यात होते. त्यामुळे पन्नास टक्के केळीची निर्यात केवळ एकट्या तांदलवाडी गावातील शेतकरी करतात. तर एक शेतकरी एकरी ३० ते ४० टनापर्यंत उत्पादन घेतात. तांलवाडीत बहुतांश केळी उत्पादक शेतकरी हे युवक आहेत.

फस्ट क्रॉपवर अधिक भर

केळी पिकांमध्ये पिलबाग, फस्ट क्रॉपवर हे पिक घेतले जातात. त्यात पिलबाग रोपातून दोनदा उत्पादन मिळते परंतू शेतीची पत, तसेच पिकांवर रोगराई पडून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तांदलवाडी गावातील बहुंताश शेतकरी हे ग्रॅण्ड नाईनचे रोपांतून फस्ट क्रॉपच्या केळी लागवडीवर अधिक भर देतात. एकट्या तांदलवाडी गावात सुमारे ११ लाख रोपांची टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लागवड केली जाते. त्यामुळे चांगले उत्पादन, दर्जेदार केळी, केळीच्या झाडावर रोगराई कमी, आणि शेतीची पत देखील चांगली राहते. या केळीला परदेशातून मोठ्या प्रमाणातून मागणी मिळते.

लावड केल्यापासून पिकांची घेतली जाते काळजी

पारंपरिक केळी उत्पादनच्या पद्धतीमूळे उत्पादन कमी मिळत असल्याने गावातील तरुण शेतकऱ्यांकडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केला जात आहे. त्यात रोपांची लागवड केल्यानंतर वेळोवेळी रोपांची काळजी, टिंबक तंत्रज्ञाने पाणी देणे, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी पोषक अशा खतांचा वापर असे आधुनिक पद्धतीने अन्न द्रव्य व्यवस्थापनातून शेती केली जात आहे. तसेच झाडाला केळी लागल्यावर रोगराई पडू नये यासाठी औषधांची फवारणी, तसेच केळीला इंजेक्शन दिल्यावर केळीवर रोगराई न पडता चांगली दर्जात्मक केळी मिळते.

केळी पॅकींगवर भर

केळी परदेशात निर्यात करायची असल्यास आणि केळीला चांगला भाव मिळावा यासाठी फळ पॅकिंग प्रोसेसिंग खुप महत्वाची आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी पॅकिंगची व्यवस्था आहे. त्यातील एक जळगावमध्ये आहे. परंतू गावातून केळी आणून आणि ती पॅकिंग करून पुन्हा निर्यातीसाठी पाठविणे हे खर्चिक होते. त्यामुळे तांदलवाडी गावात महाजन बनाना एक्सपोर्ट हे पॅकींग हाऊस तयार केले आहे. अन्य शेतकऱ्यांची केळीही येथे पॅक केली जाते. येथे पॅकींगवर भर अधिक दिला जातो. त्यात केळीच्या घडांची स्वच्छता, तसेच केळी पॅकिंग करतांना सर्व जैवपद्धतीने पॅकिंग केली जाते.

अरब देशातून मागणी...

जळगाव जिल्ह्यातील ९० केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जेदार केळी उत्पादनासाठी ‘जीआय’ (जॉग्राफी इन्डेकशन) मानांकन मिळाले आहे. ‘जीआय’ मानांकनाची केळी ही दर्जामध्ये सर्वोत्कृष्ट समजली जाते आणि ग्राहकांमध्ये अशा केळीची मोठी मागणी असते. त्यानुसार यंदा अरब देशातून केळीला मोठी मागणी असून नुकताच दुबईला केळी रवाना झाली आहे.

‘जीआय’ मानांकन म्हणजे काय..

जीआय मानांकन म्हणजे भौगोलिक दृष्टा पिकांची गुणवत्ता ठरवली जाते. त्यानुसार एक ब्रॅण्ड तो बाजारात आणला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली येथील शास्त्रज्ञांकडे जळगाव जिल्ह्यातील केळीचे महत्व पटवून दिले. यात ४० ते ४५ अंश तापमानात केली जाणारी केळीची लागवड, काळी कसदार माती, तसेच सातपुड्यातून येणाऱ्या तापी नदीच्या पाण्यामुळे केळीला येणारा गोडवा याचे महत्व पटवून दिल्यावर जीआय मानंकन मिळाले.

एक कंटेनरमध्ये २० टन केळी

मार्च ते जून हा कालावधी केळीसाठी खूप महत्वाचा असतो. तयार झालेली केळी झाडावरून काढून घडांची स्वच्छता, तिचे पॅकिंग करून ती निर्यात करण्याचे काम सुरू असते. जळगाव जिल्ह्यातून निर्यात केलेली जाणारी केळी ही कंटेनरमधून परदेशात पाठवली जाते. त्यात २० टन केळी एका कंटेनरमध्ये असते. केळीला मिळालेल्या दरानुसार एका कंटेनरची किमंत ठरवली जाते. टॅक्स, प्रोसेसिंग आदी कर आकारून साधारण अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना एका कंटेनर मधून मिळते.

जळगाव जिल्ह्यातील तसेच विशेष करून तांदलवाडीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या केळीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे मोठा फायदा होणार आहे. त्यांची दर्जात्मक केळीला परदेशातून चांगली मागणी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जात्मक केळी उत्पादनासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

- प्रेमानंद महाजन, शेतकरी, (महाजन बनाना, डायरेक्टर)

जीआय मानांनक मिळालेली केळी प्रथमच दुबईला एक कंटेरन निर्यात केली आहे. त्यामुळे जळगावच्या दर्जात्मक केळीला आता परदेशातून चांगली मागणी असून विशेष करून अरब देशातून अधिक मागणी आहे. त्यानुसार आता तांदलवाडील शेतकऱ्यांचे आता युरोपमधील मार्केट जाण्याचे उद्दीष्ट आहे.

- प्रशांत महाजन-शेतकरी, (महाजन बनाना, डायरेक्टर)

तीन वर्षापासून केळीला जीआय मानाकंन मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. याला यश मिळाले असून युरोप मार्केटमध्ये याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. परंतू कृषी विभागाकडून जीआय मानंकनाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

- शंशाक पाटील, शेतकरी. (अध्यक्ष- निर्सगराजा कृषी विज्ञान केंद्र. तांदलवाडी)