

Tanmay Pendse and Nirmaanam
esakal
सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com
एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देताना तिचं समाजातील स्थान, तिची आवडनिवड, ती भेटवस्तू देण्यामागचं निमित्त याचा बारकाईनं विचार करून तशी भेटवस्तू बनविणारा कलाकार दुर्मीळच असतो. अगदी कमीत कमी वेळात हवी तशी वस्तू बनवून देताना कलाकाराची कसोटीच लागते; पण अशा कसोटीच्या वेळीच दर्जेदार वस्तू बनवून देणारा कलाकार लोकांच्या स्मरणात राहतो आणि त्याने बनवून दिलेल्या भेटवस्तूंनी त्या, त्या पाहुण्याचे दिवाणखाने सजत राहतात. असा एक, एकाच कलाकाराने बनवलेल्या भेटवस्तूंनी सजलेला दिवाणखाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि तन्मय पेंडसे हे त्या कलाकाराचं नाव, त्याच्या ‘निर्माणम्’ संस्थेने बनवलेल्या २७ भेटवस्तू आजवर पंतप्रधानांच्या संग्रहालयात मांडून ठेवण्यात आल्या होत्या, त्या बनवणाऱ्या तन्मयची ही प्रेरणादायी कहाणी...
तन्मय पेंडसे नाव कुठे-कधी ऐकलंय, काही आठवतंय? होय, तोच तो. २०१२ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन-अडीच वर्षे वयाच्या प्रत्युष नावाच्या मुलासह मोटार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अक्षय पेंडसे नामक अभिनेत्याचा भाऊ. अक्षयबरोबरच त्या अपघातात आनंद अभ्यंकर नावाचा आणखी एक गुणी अभिनेता जागीच मृत्युमुखी पडला होता. द्रुतगती महामार्गावर झालेला तो पहिलाच अपघात नव्हता, त्याहीआधी झालेल्या आणखी काही अपघातात ‘फुलराणी’ फेम भक्ती बर्वे मृत्युमुखी पडली होती. असे अपघात कमी व्हावेत, यासाठी वारंवार मागण्या केल्या जात होत्या, आंदोलने केली जात होती; पण प्रत्यक्षात काहीच घडत नव्हतं. अशावेळी आपणच पुढाकार घेऊन, पदरचे पैसे खर्च करून यासाठी काही करावं, असं तन्मयच्या मनात आलं आणि त्यानं ‘अक्षयमार्ग’ नावाची योजना हाती घेतली आणि तेच आपल्या जगण्याचं उद्दिष्ट बनवलं. पदरचे १५ लाख रुपये खर्च करून त्यानं ठोस उपाययोजना घडवून आणली. अपघात कमी व्हावेत, जखमींना तातडीनं उपचार मिळावेत, यासाठी सखोल अभ्यास करून एक दिशादर्शक अहवाल तयार केला. अर्थात, त्यामागे होती त्यानं वैयक्तिक वेदनेला दिलेली समाजकार्याची दिशा...