

Taste Atlas World Food Rankings
esakal
‘टेस्ट अटलास’ने जगभरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ, ती मिळण्याची शहरं आणि ठिकाणं यांची जी प्रचंड मोठी यादी तयार केली आहे. त्यात जेवणानंतर खाल्ल्या जाणाऱ्या डेझर्ट म्हणजे थंड गोड पदार्थांत यंदा कुल्फी आणि फिरणी या भारतीय प्रकारांनाही स्थान मिळालं आहे. जगात उत्तम खाद्यपदार्थ मिळणाऱ्या १०० देशांच्या यादीत भारत १३व्या स्थानी आहे.
मुंबईत मिसळ खावी ‘आस्वाद’ वा ‘विनय’ची असं नेहमी म्हटलं जातं. वडापाव म्हणताच काहींना ‘गजानन’ तर काहींना ‘अशोक’ची आठवण होते. दक्षिण भारतीय पदार्थ खावेत ‘रामाश्रय’मध्ये, भाजीपाव ‘सरदार’ आणि ‘अमर ज्यूस सेन्टर’चा उत्तम, ‘बाबा फालुदा’ सर्वात बेस्ट, ‘ठाकर्स’चं जेवण उत्तम अशा चर्चा नेहमीचं झडतात आणि ऐकू येतात. खाण्यासाठी मुंबईसारखं दुसरं ठिकाण नाही, असंही ठामपणे सांगितलं जातं. अनेकांना बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा हे पंजाबी प्रकार आवडतात. भारतासारखे मसाले आणि मसालेदार पदार्थ अवघ्या जगात भारी, असं आपण म्हणतो. ते आईसक्रीम खाऊन कंटाळा आला, त्यापेक्षा कुल्फी मस्त किंवा आज जेवणानंतर मातीच्या कुल्हडमधली फिरणी खाल्ली, असं बोललं जातं; पण ही चर्चा आपणच करतो आणि तीही राहते आपल्यापुरतीच. हे खाद्यपदार्थ जगभर लोकप्रिय झाले आणि तेथील लोक ते आवडीने खाऊ लागले तर त्याला अधिक महत्त्व येतं. आज भारतातील बटर चिकन, डोसा, बिर्याणी, सामोसा हे प्रकार जगभर प्रेमाने खाल्ले जातात. तसं अन्य भारतीय प्रकारांचं होणंही आवश्यक असतं. जसं आपल्याकडे चायनीज, इटालियन, थाई खाद्यप्रकार लोकप्रिय झाले, तसं आपले प्रकार जायलाच हवेत. खरं तर असंख्य भारतीय व मराठी पदार्थ अन्य देशांतील लोक तिथं वा इथं आल्यावर मुद्दाम खातात.