
२७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकन संघाने आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून टेंबा बवुमाने सुवर्ण गदा हाती घेतली. संघातील खेळाडूंनीच नव्हे तर तमाम माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी आनंदाश्रू ढाळले. ज्याची हिणवणी नेहमी आरक्षणातील कर्णधार म्हणून केली गेली, त्या टेंबा बवुमाने दोनही डावात सुंदर फलंदाजी करून संघाला तारले. हा विजय दक्षिण आफ्रिकेला नवी उमेद, नवी आशा आणि नवा उत्साह देणारा आहे.
वर्णद्वेषी राजवट संपून जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले तेव्हा तो संघ चांगलाच होता. दर्जेदार वेगवान गोलंदाज संघाची ताकद होती. अगदी पहिल्यापासून त्यांनी जगातील भल्या भल्या नामांकित फलंदाजांना हादरवून सोडले होते. पुनरागमन केल्यावर १९९२च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडसमोर खेळताना दक्षिण आफ्रिकेला धावांचा पाठलाग करताना पाच षटकांत ४५ धावा करायच्या होत्या. अचानक पाऊस आल्याने तेच ध्येय १३ चेंडूंत २२ धावांवर आणले गेले. पाऊस परत आल्याने तेच ध्येय एक चेंडूत २२चे झाले इतका त्या पावसाच्या चुकीच्या नियमाचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला होता. तो सामना उपांत्य सामना होता हे विसरायला नको.