
शानदार झगमगीत, आधुनिक ‘बॉम्बे टॉकीज’चा एकेक चिरा ढळत गेला. हिमांशु राय यांच्या निधनानंतर शशधर मुखर्जी आणि अनिय चक्रवर्ती यांनी ‘बॉम्बे टॉकीज’ सांभाळलं. ‘कंगन’, ‘बंधन’, ‘झूला’, ‘नया संसार’ नंतर ‘किस्मत’ने मात्र अलिबाबाची गुहा उघडली. अशोककुमार यांचा गुन्हेगारी विश्वातला नायक, अनिल विश्वास यांचं संगीत असं काही जादू करून गेलं की ‘किस्मत’ने तीन वर्षे रॉक्सीमधला मुक्काम हलवला नाही. ‘दूर हटो ऐ दुनियावालो..’ या कवी प्रदीप यांच्या गाण्याने दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलेल्या ब्रिटिशांच्या जखमेवर मीठ चोळले गेले.
पूर्व बंगालच्या बारीसालहून कलकत्ता आणि मुंबईत आलेले अनिल विश्वास लिहितात, ‘किस्मत’च्या यशाबद्दल की ‘‘आम्ही लोकसंगीताची वाट शोधत होतो; पण ‘खजांची’मधील यशानं आम्हाला संगीतकार गुलाम हैदर यांनी जणू लोकप्रिय संगीताचा मूलमंत्र दिला. तीच गोष्ट पाठोपाठ आलेल्या ‘रतन’ या चित्रपटाच्या लोकप्रिय संगीताबद्दल झाली. लखनौहून आलेल्या नौशाद साहेबांना गुलाम हैदर यांच्या संगीतानं प्रेरित केलं. नौशाद साहेब म्हणतात, मा. गुलाम हैदर यांनी चित्रपटाच्या लोकप्रिय संगीतामुळे आमच्या मानधनात वाढ झाली आणि पडद्यावर संगीतकार म्हणून नाव झळकू लागलं.