

Sports Events 2026
esakal
नवीन वर्षाची सुरुवात होताना खेळप्रेमींना चाहूल लागते ती येणाऱ्या वर्षात कोणत्या मोठ्या स्पर्धा खेळाच्या दुनियेत होणार त्याची. जानेवारीपासून थेट डिसेंबरपर्यंत विविध खेळातील लक्षणीय लढतींची रेलचेल २०२६ मध्ये अनुभवायला मिळणार या विचारांनी खेळांवर प्रेम करणारे लोक विचारांनी हरखून जात आहेत. नेहमीच्या स्पर्धा तर आहेतच; पण त्याबरोबर टी-२० विश्वचषक आणि जगाचे लक्ष लागून राहिलेला फुटबॉल विश्वचषक २०२६मध्ये होणार आहे. म्हणूनच म्हणतोय, की २०२६ कडे वाट बघण्यासारखे बरेच काही आहे.
इंग्लंड ऑस्ट्रेलियादरम्यानच्या शेवटच्या कसोटी सामन्याने २०२६ची सुरुवात होईल. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियन संघाने जिंकली असली तरी सिडनी शहरात होणाऱ्या पारंपरिक न्यू इयर कसोटी सामन्याचे महत्त्व कमी होत नाही. ऑस्ट्रेलियन संघ शेवटचा कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघाला व्हाईट वॉश देतो का, हेच शेवटच्या दोन कसोटी सामन्यातून समजणार आहे. मालिका हातून गेली तरी नामुष्की वाचवायला इंग्लंड संघ काही लढत देतो की हाताला पांढरा रुमाल बांधून शरणागती पत्करतो हेच बघायचे आहे. सलग तीन कसोटी सामन्यातील भयानक मोठ्या पराभवांनंतर इंग्लंड संघावर होणारी टोकाची बोचरी टीका पचवून बेन स्टोक्सचा संघ लढत देण्याची मानसिक कणखरता दाखवतो का, हा मोठा उत्सुकतेचा भाग आहे. पाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा मेलबर्न शहरात चालू होणार आहे. मुख्य लक्ष कार्लोस अल्काराझ-यानिक सिनरवर असेल आणि एक नजर जोकोविचवरही राहणार.