

Bangladesh Political Transition
esakal
डॉ. मनीष दाभाडे- सहयोगी प्राध्यापक, जेएनयू
बांगलादेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. सरकारविरोधी आंदोलन, त्यातून सत्तेवरून पायउतार झालेले सरकार, हंगामी सरकारचा कालखंड आणि त्यानंतर निवडणुका या टप्प्यांनंतर बांगलादेशात हे सत्तांतर होत आहे. त्यामुळे बांगलादेशासाठी स्थैर्य व विकासाची ही ऐतिहासिक संधी आहे.
बांगलादेशात नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने (बीएनपी) मिळवलेले प्रचंड बहुमत हे केवळ एका निवडणुकीतील सत्तांतर नाही; ते बांगलादेशाच्या राजकीय इतिहासातील एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे. अनेक वर्षे एकाच राजकीय प्रवाहाच्या वर्चस्वाखाली राहिलेल्या व्यवस्थेनंतर मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे राजकीय परिस्थिती पूर्वपदावर आणणे, स्पर्धात्मकता आणि संस्थात्मक संतुलन यांची नव्याने मागणी होय. या निवडणुकीचे ऐतिहासिक महत्त्व असे की, ही निवडणूक फक्त सरकार बदलण्यापुरती मर्यादित नाही; तिने राजकारणाचे नियमच बदलले आहेत. रस्त्यावरच्या आंदोलनांनंतर, अंतरिम व्यवस्थेच्या स्थापनेनंतर आणि निवडणूक प्रक्रियेच्या पुनर्रचनेनंतर मतदान करताना, आपल्या मताला अर्थ आहे, असा विश्वास मतदारांना मिळाला. त्यामुळेच हा निकाल बांगलादेशातील लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाचा क्षण म्हणूनही पाहिला जात आहे.