
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
शिबिरादरम्यान विद्युल्लताला आडोशाचा मोठा प्रश्न होता. मग सोनीबाईला, देऊबाईला घेऊन तिने त्यावर मार्ग काढला. तीन दिवसांत झोपडीच्या बाजूलाच लुगडी लावून या दोघींनी आंघोळी कशातरी उरकून घेतल्या. मला मात्र सकाळी उठल्यावर लोकांबरोबर शेताच्या बाजूच्याच वाहत्या नाल्यात डुंबून आंघोळ करायला मजा येत होती. मला पोहता येत नव्हतं; परंतु नाला तितकासा खोलही नव्हता. मात्र पाणी नितळ नि शुद्ध होतं. नाल्यातल्या दगडावर बसून छान आंघोळ करता येत होती.