Premium|Ambadas Sawane Case 1991: संविधान दिले हाता, तरी कित्येक उरले चोखा...

Caste Discrimination in Maharashtra History : पिंपरी-देशमुख येथील अंबादास सावणे यांच्या हत्याकांडाने हादरलेल्या मराठवाड्यातील सरंजामी जातीयवादाचा पडदा फाडत, संविधानिक हक्कांसाठी दिलेल्या कडव्या लढ्यातून अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सन्मानाने स्थापना कशी झाली, याचा अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक प्रवास.
Ambadas Sawane Case 1991

Ambadas Sawane Case 1991

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन जगणाऱ्या अंबादास सावणेला गावात बाबासाहेबांचा पुतळा उभारायचा होता; परंतु गावकऱ्यांच्या विरोधामुळे तो बसवण्याचं धैर्य तो एकवटू शकत नव्हता. देव बाटवला म्हणून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. अंबादासच्या निमित्ताने आम्ही कडवा लढा दिला. पाच आरोपींना तुरुंगवास झाला आणि अखेर संविधानकर्त्याच्या पुतळ्याची स्थापना झाली...

२३ ऑगस्ट १९९१... ‘अंबादास सावणेच्या स्मरणार्थ पिंपरी-देशमुख गावात मुलांना वह्या-पुस्तकं देण्यात येणार आहेत... गावात शांतता आहे,’ अशा मथळ्याची बातमी परभणीचे पोलिस अधीक्षक रा. ना. दहाटे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती... ती वाचताच क्षणी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ‘गावात शांतता आहे’ याची जाहीर ग्वाही खुद्द पोलिस अधीक्षकांकडून द्यायची गरज काय असावी? या शांततेच्या आड जुलुमी दडपशाही तर नसेल? माझ्या वाढदिवसानिमित्ताचे सारे नियोजित कार्यक्रम रद्द करून मी बीडच्या माजलगावहून पिंपरी-देशमुख गावाला जायला निघालो...

मराठवाड्यात मानवी हक्क अभियानाचं काम करत असताना निजामाच्या काळापासून आलेल्या सरंजामी वृत्तीचा प्रत्यय मी पावलोपावली घेत होतो. कुणाचाही परिचय करून देताना ‘तू कुणाचा रे?’ हा प्रश्न ठरलेला! मग तो बामणाचा, कुणब्याचा, वाण्याचा, महाराचा अशी ओळख आधी सांगावी लागे... आडनावावरूनच जात लागलीच ओळखली जाई... न्हाव्याकडे दाढी करताना कुणी गाल फुगवला, की हा ग्राहक घरी दाढी करीत असावा म्हणजे हा महारामांगाचा असणार, हे ताडून त्याला दुकानाबाहेर हाकलून दिल्याचं मी सतत ऐकत होतो. जातीयता मराठवाड्याच्या मातीत इतकी कडवी रुजली होती, की त्यामुळे अंबादासच्या आडनावावरून ‘सावणे’ म्हणजे बौद्ध (महार) हे कळायला मला वेळ लागला नाही...

मानवी हक्क अभियानाचे उदगीरचे कार्यकर्ते बाबुराव धुळे माझ्यासोबत होते. परभणीजवळच्या पाथरी येथे भीमशाहीर आत्माराम साळवे यांनाही सोबत घ्यावं म्हणून आम्ही शोध घेतला. साळवे म्हणजे नामांतराच्या लढ्यात स्वत:ची शेतीवाडी विकून पूर्ण भुकेकंगाल झालेला कडवा कार्यकर्ता... प्रवासभर माझं मन अस्वस्थ होतं. सोबत असलेला भीमशाहीर त्याच्या खड्या आवाजात कवनं गात होता...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com