
पीतांबर लोहार
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सलग तिसरा अर्थसंकल्प प्रशासकांनी मांडला आहे. त्यात तत्कालीन प्रशासक राजेश पाटील यांनी एक आणि विद्यमान प्रशासक शेखर सिंह यांनी दोन अर्थसंकल्प मांडले आहेत. दोघांनीही लोकसहभागावर भर दिलेला दिसतो. लोकप्रतिनिधी असताना प्रस्तावित झालेले मात्र आरोप-प्रत्यारोप होऊन केवळ कागदावर राहिलेले प्रकल्प प्रशासकांनी मार्गी लावले आहेत. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा नियमित वा २४ तास करणे, शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांचे व शहरातील हवेचे प्रदूषण कमी करणे, अनधिकृत होर्डिंगद्वारे होणारे शहराचे विद्रुपीकरण रोखणे, असे महत्त्वाचे व नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पूर्णतः सोडविण्यात प्रशासकांना अपयश आलेले दिसते.