
‘एआय’ युद्धाची सुरुवात झाली ती ‘डीपमाइंड’ या कंपनीपासून. वयाच्या चार वर्षांपासून चेसचं वेड असणाऱ्या, तेराव्या वर्षीच चेस चॅम्पियन झालेल्या, जगातल्या १०० महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये दोनदा नाव आलेल्या, प्रोटिन फोल्डिंगच्या संशोधनाबद्दल रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळवलेल्या डेमिस हसबीसला मेंदूविषयी खूप आकर्षण वाटायचं. इतकं की, त्याच्या फेसबुकचा प्रोफाइल फोटो म्हणजे एक ‘एमआरआय’ स्कॅन होता! मेंदूच्या अभ्यासावरूनच म्हणजेच न्यूरोसायन्सचा अभ्यास करून आपल्याला ‘एआय’विषयी ज्ञान होईल, असं त्याला वाटायचं. एकदा शेन लेग आणि मुस्तफा सुलेमान यांच्याबरोबर लंच घेत असताना ‘एआय’च्या संदर्भात एक कंपनी काढण्याचा हसबीसचा विचार पक्का झाला. २०३० सालापर्यंत कॉम्प्युटर्स माणसापेक्षा जास्त स्मार्ट होतील आणि त्यानंतर आपण कॉम्प्युटरच्या किंवा ‘एआय’च्या प्रगतीला थांबवू शकणार नाही, असं लेगला वाटायचं.
या क्षणाला सिंग्युलॅरिटी असं नाव पडलं. लेग यानंच ‘आर्टिफिशल जनरल इंटेलिजन्स (एजीआय)’ हे नाव लोकप्रिय केलं. कुठल्याही एका क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात जे करू शकतो किंवा निदान ज्या तऱ्हेनं विचार आणि तर्क मांडू शकतो ते यंत्र करू शकल्यास त्याला ‘एजीआय’ असं म्हणावं, अशी यामागची कल्पना होती. याउलट फक्त एका क्षेत्रापुरतं ‘एआय’ मर्यादित असल्यास त्याला ‘आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स’ (एएनआय)’ असं म्हणावं आणि जेव्हा माणसापेक्षा बरीच जास्त बुद्धी असलेलं ‘एआय’ तयार होईल तेव्हा त्याला आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स (एएसआय) म्हणावं अशाही व्याख्या मग प्रचलित झाल्या; पण या सगळ्याविषयी एकमत मुळीच नव्हतं. या सगळ्या गोंधळात अनेक लोक ‘एजीआय’ म्हणजे काय, हे माहीत नसलं तरी त्याच्या मागं धावत होते.