
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
तीन कसोटी सामने झाले, ज्यात जितकी चर्चा मैदानावर घडलेल्या क्रिकेट नाट्याची झाली तेवढीच इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्युक्स क्रिकेट बॉलची झाली आणि हो तिसऱ्या कसोटीसाठी लॉर्ड्स मैदानावर आल्यावर सामन्याअगोदरचे दोन दिवस आणि सामन्याचे पाच दिवस असे सात दिवस मिळून बऱ्याच वेळा लॉर्ड्सवर असलेल्या आठ फुटांपेक्षा जास्त उताराची चर्चा झाली. चौकार गेला तरी उतार.. गोलंदाजी करताना उतार... सतत जे स्वतःला क्रिकेटचे माहेरघर म्हणवून घेतात त्या लॉर्ड्स मैदानावरच्या अत्यंत त्रासदायक उताराची चर्चा. राग याचा येतो, की या उताराबद्दल चिडून नव्हे तर कौतुकाने बोलले जाते.
थोडक्यात ड्युक्सचा सतत आकार जाणारा आणि ४० षटकांनंतर मऊ होणाऱ्या चेंडूची चर्चा आणि मैदानाच्या उताराची चर्चा ऐकून मोठ्यांदा ओरडून सांगावेसे वाटते, की अरे या चुका आहेत... त्यात बदल करा... त्याची चर्चा करू नका... कौतुकाने तर अजिबात करू नका; पण क्रिकेटचे प्रणेते म्हणणारे लोक किंवा क्रिकेटचे माहेरघर म्हणून आपले आपण मिरवणारे मेरलीबोन क्रिकेटचे तथाकथित क्रिकेट पंडित चूक करत आहोत, हे जाणत असून बदल घडवून आणायची वाच्यता करत नाहीत, याचा मनोमन राग येतो.
लॉर्ड्सवर आठ फुटांपेक्षा जास्त असलेल्या उताराबाबत मी काहीच जास्त माहिती देऊ शकत नाही; पण सतत आकार बदलणाऱ्या आणि ४० षटकांनंतर मऊ होऊन गोलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या ड्युक्स क्रिकेट चेंडूचे प्रकरण काय आहे, का या चेंडूचा आकार बदलतो आहे, चेंडू तयार करण्याच्या प्रक्रियेत नक्की कुठे गडबड होते आहे, याचा थोडा अंदाज मला आहे म्हणून त्याच्यावर प्रकाश टाकतो.