

सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
सिनेमाच्या सुरुवातीला येणारे विशेष आभार अत्यंत महत्त्वाचे आणि त्याची थीम सांगणारे असू शकतील, असं आपल्याला कधी वाटतं का? आपण कधी ते वाचतो तर कधी सोडून देतो; पण ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा मल्याळम सिनेमा सुरूच होतो ‘थँक्स सायन्स’ या वाक्याने. आता तसं तो सिनेमा का म्हणत असावा, विज्ञानाचे आभार तो का मानतो इत्यादी प्रश्नांचा उलगडा आपल्याला तो पाहताना होतो. (लक्षात घ्या, की हा सायन्स फिक्शन वगैरे सिनेमा नाही. त्याच्या नावातच ‘किचन’ आहे.)
‘द ग्रेट इंडियन किचन’ हा मल्याळम चित्रपट सुरू होतो तेव्हा दोन सीन एकत्र सुरू असतात. एकीकडे मुलगी नाचत आहे; तर दुसरीकडे पंचपक्वान्न बनत आहेत. नंतर आपल्याला उलगडा होतो, की त्याच मुलीच्या कांद्यापोह्याच्या म्हणजेच बघण्याच्या कार्यक्रमासाठी त्या सगळ्या गोष्टी बनत होत्या. त्या मुलीला बघायला एक मुलगा येतो आणि एका मिनिटाच्या आत ती लग्न होऊन सासरी आलेलीही असते. संपूर्ण सिनेमात आपल्याला कधीही नवरा किंवा बायकोचं नाव कळत नाही. त्यांची जात, ओळख काहीच कळत नाही. ती आपल्यासारखीच कोणतीही सामान्य जोडी असू शकते त्यासाठीचं हे प्रयोजन. इथवर आणि इथून पुढेही घडणाऱ्या घटना ९० टक्के घरात घडतात तशाच आहेत; पण फरक पडतो तो जिओ बेबी या दिग्दर्शकाने त्याच्या लेखन आणि दिग्दर्शनातून मांडलेल्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे.