
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
वसईचे तहसीलदार रा. वि. भुस्कुटे कडक शिस्तीचे होते. त्यांच्याशी झालेली पहिली भेट मात्र भविष्यात संघटनेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा ठरली. भुस्कुटे यांच्या मदतीमुळेच एका वेठबिगाराचा जबाब तहसील कार्यालयात नोंदवला गेला. ‘इंदिरा गांधींच्या कार्यक्रमातलं सहावं कलम आहे वेठबिगारांना मुक्त करून पुनर्वसन करायचं. २० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची जबाबदारी माझ्यावर आहे,’ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांच्या पत्रानंतर वेठबिगाराच्या मालकावर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला... देशातला तो दाखल झालेला पहिला गुन्हा ठरला.
वेळचं वसई तहसील कार्यालय म्हणजे कौलारू दगडी भिंतीच्या प्रशस्त वाड्यासारखंच होतं. तालुक्याच्या प्रशासकीय यंत्रणेचं मुख्य केंद्र... लोकांच्या मनात या वास्तूविषयी एक आदरयुक्त भीती कायमच असायची. या वास्तूत बसणारे ‘तहसीलदार’ यांना लोक ‘मामलेदार’ म्हणत. त्यांचा तालुक्यात दरारा असे.