

US Hegemony Decline
sakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
मागच्या दोन लेखांमध्ये आपण साम्राज्यांच्या उदयास्ताची कारणं बघितली. त्याचबरोबर सध्याचं जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य असणाऱ्या अमेरिकेचा उदय कसा झाला हे सुद्धा बघितलं. आज आपण अमेरिकेचा अस्त का आणि केव्हा होईल हे बघू या. जगातल्या प्रमुख साम्राज्याचा इतिहास बघितला तर एक गमतीशीर गोष्ट आपल्या लक्षात येते. स्पॅनिश साम्राज्य १०० वर्षं, ऑटोमन ११३ वर्षं, मुघल १०७ वर्षं, ब्रिटिश १०५ वर्षं आणि चीनमधलं चिंग साम्राज्य ११६ वर्षं पूर्ण भरात होतं. रोमन, मंगोल आणि पर्शियन साम्राज्याचा अपवाद सोडला तर कोणत्याही साम्राज्याच्या उदयापासून पूर्ण भराचा काळ हा साधारणपणे १०० ते ११० वर्षांचा राहिला आहे. साम्राज्यांच्या या इतिहासानुसार १९५० च्या दशकात महासत्ता झालेली अमेरिका साधारणपणे २०५० पर्यंत महासत्ता राहायला हवी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातल्या विविध तज्ज्ञांनी सिनॅरिओ प्लॅनिंग मॉडेल्स वापरून काढलेला निष्कर्ष याच्याशी मिळताजुळता आहे. २०३० च्या आसपास अमेरिकेची ताकद कमी व्हायला लागेल आणि २०५० च्या आसपास तिची महासत्तापदावरून घसरण होईल याबाबत बहुतेक तज्ज्ञांचे एकमत आहे. अमेरिकेची ताकद कमी होण्यामागची कारणं आता आपण समजून घेऊ या.