
कल्याणी शंकर
येत्या २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या तयारीत असलेले अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर वेगळ्याच समस्या आ वासून उभ्या आहेत. स्थलांतरित आणि एच-१बी व्हिसा या मुद्द्यांवरून अमेरिकेमधील प्रमुख दोन गटांमध्ये मतभेद आहेत.
त्यामुळे या मुद्द्यावरून निवडणुकीच्या कालावधीत ट्रम्प यांना प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात निधी देणाऱ्या ‘टेक’ कंपन्यांचे मालक आणि त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचे खंदे समर्थक या दोघांचेही समाधान करण्याचे आव्हान ट्रम्प यांच्या समोर आहे.
अलीकडेच ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात, परदेशी कुशल कामगारांसाठीच्या एच-१बी व्हिसाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविणारे वक्तव्य केल्याने या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर ट्रम्प सरकारचे नेमके धोरण काय असेल याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
‘‘मला हा व्हिसा आवडतो, मी कायमच या व्हिसाबाबत सकारात्मक आहे. म्हणूनच तर त्या व्हिसावर येथे राहत असलेले नागरिक आहेत. व्यावसायिक कारणांसाठी मीदेखील अनेकदा एच-१बी व्हिसाचा वापर केला आहे. माझा या व्हिसावर विश्वास आहे. हा एक अतिशय उत्तम प्रकल्प आहे,’’ अशा आशयाची विधाने ट्रम्प यांनी केल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.