

Antibiotic Resistance
esakal
आयसीएमआरच्या अहवालातून देशात सूक्ष्मजंतूंच्या उपचारात अँटिमायक्रोबिअल औषधांना प्रतिरोध वेगाने वाढत असल्याचे एक भयावह चित्र सामोरे आले आहे. अँटिबायोटिक्स योग्य पद्धतीने न वापरण्यामुळे प्रतिजैविकांच्या वाढत्या प्रतिरोधाला आताच आळा घातला नाही, तर साधे संसर्गजन्य आजार बरे न होता प्राणगंभीर बनतील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’मध्ये अँटिबायोटिक्सचा गैरवापर आणि स्व-औषधोपचार टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आयसीएमआरच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, की न्यूमोनिया आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग) सारख्या आजारांवरची बरीच औषधे आता जंतूंना नष्ट करण्यात कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे फक्त मोठ्यांनीच नव्हे; तर बाळांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटिबायोटिक्स देणे अनिवार्य आहे.
भारतामध्ये होणारा अँटिबायोटिक्सचा अनिर्बंध वापर टाळण्याबाबत डॉक्टर, तसेच अनेक वैद्यकीय संस्था गेली २५ वर्षे वारंवार आवाहन करत आहेत; पण त्याचा परिणाम जनतेवर होत नव्हता; मात्र ‘सोनारानेच कान टोचावेत’ तसे खुद्द पंतप्रधानांनी त्याबाबत जाहीर विधान केल्यावर आता तरी काही बदल होऊ शकेल, अशी आशा आहे.
पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या, आयसीएमआरच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात, अँटिबायोटिक्सच्या अतिरिक्त वापराबद्दल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चिंताजनक परिस्थितीचे विश्लेषण आहे.