
खासगी नोकऱ्यांत जास्तीत जास्त काम करा, असे वारे वाहू लागले आहेत. रविवारीही घरी बसून काय त्याच त्या बायकोचा चेहरा पाहत बसायचे का? असे कॉर्पोरेट विचारणे होऊ लागले आहे. अशात सरकारी कामाचा आठवडा पाच दिवसांचा झाला आहे. दिल्लीची निवडणूक पाहून का होईना; पण आठवा वेतन आयोग लागू केला आहे.
श्याम पेठकर
pethkar.shyamrao@gmail.com
एक मोठा धनाढ्य सेठ होता. अर्थातच त्याचा त्या गावाच्या अगदी मध्य भागात म्हणजे केंद्रस्थान असलेल्या ठिकाणी मोठ्ठा बंगला होता. गाव मराठी माणसेच वसवितात. तेव्हा मुख्य गाव असलेल्या भागातील जमिनी मराठी माणसाच्या ताब्यात असतात. जमिनीचे भाव वाढत जातात तशी मराठी माणसाची ऐपत नाही वाढत. चार-आठाणे चौरस फुटाचा भाव असताना मराठी माणसे ती जागा घेऊन घरे बांधतात.
काळाच्या ओघात जमिनीचे भाव वाढत जातात. दहा हजार रुपये चौरस फुटापर्यंत जमिनीचे भाव जातात आणि मराठी माणसाची ऐपत मात्र आठाणे... फारच झाले तर रुपया-पाच रुपये चौरस फुटाचीच राहते. मग मराठी माणसे दहा हजार रुपये चौरस फूट भाव झालेल्या जमिनीचा ताबा सोडून वाढत्या गावाच्या सीमेच्या भागात पुन्हा पाच-दहा रुपये चौरस फुटाची जागा घेतात अन् तिकडे घर बांधतात.
अर्थात जुन्या वस्तीतील दहा हजार चौरस फुटाची जमीन विकत घेतात ते कधी काळी साधा टॉवेल नेसून आलेले अन् औकात वाढविणारे सेठ-साहुकारच... मराठी माणूस पगारावरच राहतो. सरकारी नोकरीत असला तर वेतन आयोगावर त्याची औकात थोडी वाढत असते. त्याला त्याच्या पगारातच भागवावे लागते. मग हे व्यापारीच त्याला सांगतात, पगारापेक्षा जास्त कमाई कशी करायची ते...