
हनुमान, भीम, बलराम, विष्णू, दुर्योधन या सगळ्यांच्या व्यक्तिविशेषता वैशिष्ट्यपूर्ण असल्या तरी, त्यांच्यात दोन साम्य आहेत. एक म्हणजे अफाट शक्ती आणि दुसरे म्हणजे त्यांचे आयुध-‘गदा’! उपरोक्त सर्व व्यक्तिरेखा, देवता यांचे मुख्य शस्त्र हे ‘गदा’ आहे. गदा फक्त भारतातच नाही, तर जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये शक्ती, सामर्थ्य आणि सत्तेचे प्रतीक मानले गेले आहे. मध्ययुगीन भारतात गदा ही दुय्यम शस्त्र म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. शिरस्त्राणे, चिलखत फोडणे, किल्ल्यांची दारं फोडणे यांच्यासाठी गदेचा वापर केला जायचा.
आपण या शस्त्राला ‘गदा’ म्हणतो. मात्र, हे नाव नेमकं आलं तरी कुठून असा कधी विचार केलाय का? हिंदू धर्मामध्ये गदा शस्त्राच्या उत्पत्तीच्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातली एक प्रसिद्ध कथा वैष्णव पंथाशी जोडली गेलेली आहे. ती कथा अशी की, पृथ्वीवर एकदा एक ‘गदा’ नावाचा असुर होता. असुर असला, तरी अतिशय दानशूर आणि कुठल्याही दानाला नाही न म्हणणारा म्हणून त्याची ख्याती होती. त्याची ताकद वाढायला लागली तसं त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देवांनी विष्णूला विनंती केली. विष्णूने एका कवीचे रूप घेवून गदा असुरासमोर काव्य सादरीकरण केले. त्यावर प्रसन्न होवून असुराने तुला काय हवे? म्हणून विचारलं. त्यावर विष्णूने ‘मला तुझी हाडं दे’ असं दान मागितलं. दिल्या वचनानुसार गदा असुराने स्वतःची हाडं विष्णूला दान दिली. या हाडांपासून विष्णूने एक अभेद्य शस्त्र तयार केलं आणि त्याला असुरावरूनच नाव दिलं - ‘गदा’!