

Cricket League Valuation
esakal
आयपीएल संघ मालकी आता केवळ मिरवण्याची गोष्ट न राहता अत्यंत फायदेशीर मालमत्ता बनल्या आहेत. ‘बीसीसीआय’ने अत्यंत विचारपूर्वक संघ मालकांना गुंतवलेला पैशाचा मोबदला वसूल करायला दालने खुली केली आहेत. यातील मुख्य उत्पन्नाचे स्रोत काय आहेत लक्षात घ्या. वर नमूद केल्याप्रमाणे हाती आलेला मुख्य प्रायोजकतेचा निधी ‘बीसीसीआय’ सगळा स्वत:कडे ठेवत नाही. याला सेंट्रल शेअर म्हणले जाते. प्रत्येक संघाला ‘बीसीसीआय’कडून वार्षिक अंदाजे ४००-५०० कोटी मिळतात.
जगात सध्या किती अस्थिर वातावरण आहे, याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. एका अर्थाने हे युद्ध आणि निर्माण झालेली भयानक परिस्थिती जगावर लादली गेली आहे असे वाटते. जागतिक तेल व्यवहाराला धक्का लागल्याने जीवनावश्यक सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. तमाम कंपन्या कारभारात शिस्त आणून काटकसर कशी करायची खर्च कसा कमी करायचा याचा विचार करत आहेत. अस्थिरता कधी जाईल याचा नेम नसताना सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. घर घेण्यासारखे सामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे मोठे व्यवहार पुढे ढकलले जात आहेत. बाकी जगाची गोष्ट बाजूला ठेवा, भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागतो आहे. या सगळ्या साशंक वातावरणात बातमी कानावर येते की ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ संघाची मालकी १६ हजार ७०० कोटी रुपयांना विकली गेली आहे आणि मग थक्क व्हायला होते. म्हणून या लेखातून तुम्हांला ‘आयपीएल’चे अर्थकारण जरा समजून देण्याचा प्रयत्न करतो.