
गिरिजा दुधाट
dayadconsultancies@gmail.com
मेघालयामध्ये वसणाऱ्या खासी आदिवासी समाजाच्या लोकपरंपरेत, धर्मपरंपरेत धनुर्विद्या कशा आणि कोणत्या चालीरितींमधून प्रवाही राहिली आहे हे आपण गेल्या गेल्या लेखात पाहिलं. खासी धनुर्विद्येच्या उपयोजित भागाइतकेच त्याचे तांत्रिक भाग म्हणजे धनुष्यबाणांची निर्मिती, त्यांचे घटक, त्या मागील धारणा यादेखील तितक्यात रंजक आहेत. खासी धनुर्विद्येची नागर धनुर्विद्येप्रमाणेच तीन मुख्य अंग आहेत : एक ‘कारिंत्तिए’, म्हणजे धनुष्य; दुसरे ‘खनम्’, म्हणजे बाण आणि तिसरे ‘कारिंगकाप’, म्हणजे भाता.
खासींचे वास्तव्य पर्वतांमध्ये असल्याने त्यांच्या धनुष्यबाणांच्या निर्मितीमध्ये तिथेच उपलब्ध असणारे घटक वापरले जातात. बांबू हा मेघालयातला कल्पवृक्ष! घराच्या छतापासून डोक्यावरच्या टोपीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये बांबू वापरला जातोच, मग खासींचे धनुष्यबाण तरी कसे अपवाद असावेत! खासींच्या धनुष्यबाणाचा मुख्य घटक असतो ‘बांबू’. हे धनुष्यबाण त्यांच्या लवचिकतेसाठी फक्त मेघालयातच नाही तर ईशान्य भारताच्या इतर आदिवासी जमातींमध्येही प्रसिद्ध आहेत.