

MAGA AI H-1B Conflict
esakal
अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षात मोठे वादळ निर्माण झाले आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) चळवळ या पक्षात अमेरिकेतील नोव्हेंबर २०२६ मधील संसदीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशांततेची लक्षणे दाखवत आहे. सध्या दिसत असलेले तणाव केवळ रिपब्लिकन मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करतील की पुढे जाऊन चळवळीमध्ये फूट पडेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एकसंध दिसणारी ही चळवळ आपली खरी ओळख प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘एच.वन.बी’ व्हिसा धोरणे, आणि अमेरिकेचा परदेशी युद्धांमधील सहभाग.
बराच काळ, ‘मागा’ ने स्वतःला विचारधारात्मक एकसूत्रता असलेली चळवळ म्हणून मांडले. राष्ट्रवादी, सांस्कृतिकदृष्ट्या रुढीवादी आणि ट्रम्प यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाभोवती एकत्रित झालेली चळवळ. परंतु ‘एआय’, स्थलांतर धोरण आणि जागतिक राजकारण यांचे राजकीय महत्त्व झपाट्याने वाढत असताना, चळवळीतील अंतर्गत मतभेद लपवणे अधिक कठीण झाले आहे. या वादविवादांमुळे या चळवळीत किंवा रिपब्लिकन पक्षात थेट फूट पडलेली नाही. पण हा वाद अधिकाधिक स्फोटक होत चालला आहे. तांत्रिक बदलांनी आकार घेतलेल्या जगात ‘अमेरिका फर्स्ट’चा अर्थ नेमका काय असावा हे निश्चित करण्याच्या मुळाशीच तो ताण निर्माण करत आहे.