
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
दहिसरसारख्या छोट्याशा गावात आम्ही क्रांतीची स्वप्नं रंगवत होतो. दहिसर, कण्हेर, दहिसरचे पाडे, खार्डी, कोशिंबे इत्यादी सात-आठ गावांमध्ये आमचा संपर्क आम्ही निर्माण केला होता. आमच्यासोबतचे एकनाथ आव्हाड मराठवाड्यातल्या बीडमधील माजलगावचे. दशरथ जाधव लातूरमधील उदगीरचे.
दोघंही मातंग समाजातील; तर सदाशिव राठोड यवतमाळच्या पुसदचे. ते भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे; तर प्रभाकर लकेश्री हा घाटकोपरचा राहणारा; पण बहुजन समाजाचा... सामाजिक क्रांतीसाठी दहिसरमध्ये काम करीत असताना आमच्या विविध विषयांवर चर्चा होत. आदिवासी आणि दलित अशी एकजूट झाली तर समाजात क्रांती घडून येईल, या विषयावर आम्ही कायम बोलत असू. याच काळात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठीच्या नामांतर आंदोलनाने मराठवाडा धगधगत होता.