
मैत्रेयी पंडित-दांडेकर
चवताळलेली मम्मा पुन्हा एकदा या महिन्यात आम्हाला एकही डॉलर किंवा साखरेचा एकही दाणा न देता आमच्याकडून क्लीनिंग बायकांसाठी यशस्वीरित्या क्लीनिंग करून घेते. दुसरा दिवस उजाडताच क्लीनिंग बायका अवतरतात आणि उरलेली जेमतेम ३६.३ टक्के स्वच्छता करून, पण तरीही रोख दोनेकशे डॉलर लंपास करून तासाभरात फरार होतात. आम्ही मात्र भुवया उंचावून, आऽऽ वासून आमच्या संतुष्ट मम्माकडे बघत राहतो...
आत्मनिर्भरतेचा अतिरेक असलेल्या आमच्या अमेरिकेतसुद्धा आताशा घरकाम, वरकाम, बागकाम अशा कैक कामांना मदतनीस मिळू लागले आहेत. कमीत कमी व्हिजिट्समध्ये जास्तीत जास्त पैसे कमवायचं कोडं या स्मार्ट ‘देवदूतां’नी बरोबर सोडवलंय. ठरलेल्या कामापेक्षा एखाद्या जादाच्या कामासाठी किंवा जास्तीच्या वेळेसाठी एक्स्ट्रा डॉलर्स न संकोचता मागणं कोणी यांच्याकडून शिकावं.