
तुकाराम जाधव, संचालक, द युनिक अॅकॅडमी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षाही वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये या निर्णयाची घोषणा केली. या बदलांमुळे परीक्षार्थींच्या त्या विषयाचे आकलन समजण्यास मदत होते.
भारतीय राज्यघटनेने सार्वजनिक (शासकीय) प्रशासनातील सनदी सेवापदांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगांची तरतूद केली आहे. भारताने संघराज्यीय व्यवस्था स्वीकारल्यामुळे संघ शासनाच्या (केंद्र) प्रशासनातील सनदी सेवांच्या भरतीसाठी संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी); तर घटक राज्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद केली आहे. सुमारे २० पेक्षा अधिक पदांची भरती करण्यासाठी दरवर्षी परीक्षा आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या लोकसेवा आयोगांद्वारे पार पाडले जाते.