

Thackeray Brothers Alliance
esakal
भाजपला देशभरातील वर्चस्वासाठी हिंदुत्ववादी मतांमध्ये वाटेकरी हा अडथळा असतो. त्याच धाग्यानं एकत्र आलेल्या पक्षांचंही भाजपला ओझं वाटू लागतं. महाराष्ट्रात भाजपची वाढ लक्षणीय झाली. तो सर्वांत मोठा पक्ष आहे हे निर्विवाद सिद्ध झालं, तरी भाजप स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता आणू शकतो का, यापुढंच प्रश्नचिन्ह मिटलेलं नाही. म्हणजेच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आपणच खरी शिवसेना हे अधोरेखित करण्याचं आव्हान आहे, तर भाजपसाठी हिंदुत्वात वाटकेरी नको, या दीर्घकालीन रणनीतीलाच आव्हान आहे.
दोन दशकांच्या दुराव्यानंतर सुमारे आठ महिने चर्चेत असलेली पण प्रत्यक्षात जाहीर होत नसलेली शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांची युती एकदाची जाहीर झाली. महाविकास आघाडी व्हावी यासाठी धावाधाव करणाऱ्या संजय राऊत यांचा या युतीसाठी पुढाकारही स्पष्ट होता. ती आघाडी भाजपच्या हातून सत्तेचा घास हिसकावण्यासाठी होती. आता ही युती मुंबई पट्ट्यात तरी ठाकरे नावाची किमया कायम राहावी, भाजपला रोखता यावं आणि मुंबईत तरी एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक आयोगानं अधिकृत ठरवलेल्या शिवसेनेपेक्षा आपली ताकद अधिक आहे, हे दाखवता यावं याचसाठी असेल. ठाकरे बंधूंची नवी युती प्रामुख्यानं महापालिका निवडणुकीसाठी, त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होत आहे.