Kadambini Ganguly
Kadambini GangulySakal

कादंबिनींची वैद्यक गाथा

आपल्याला देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी माहीत आहेत. अकाली निधनामुळे त्यांना वैद्यकीय व्यवसाय करता आला नाही. पण संपूर्ण दक्षिण आशियातील पहिल्या महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली मात्र तितक्याशा परिचित नाहीत. येत्या रविवारी (१८ जुलै) त्यांची १६०वी जयंती. त्यांच्या व्यक्तित्त्वाचा वेध..

तत्कालिन बंगाल प्रांतातील भागलपूर येथे १८ जुलै १८६१ रोजी कादंबिनीचा जन्म झाला. पुरोगामी विचारांचे मुख्याध्यापक ब्रजकिशोर बासू यांनी आपल्या कन्येची बुद्धिमत्ता बालपणीच जाणली . तिला डॉक्टर होण्याचे स्वप्न लहानपणीच दाखविले . ‘शिकून मोठी डॉक्टर हो आणि स्त्रियांचे आजार बरे करण्यासाठी प्रयत्न कर’ असे ते तिला सांगत. कादंबिनीला बालपणापासूनच रुग्णसेवेची आवड होती. त्याकाळी पुरुष वैद्यांकडून तपासून घेण्यास स्त्रिया तयार नसत. साहजिकच त्यांच्या औषध-पाण्याची व्यवस्था होत नसे. साथीच्या रोगाच्या वेळी कादंबिनी स्त्री-रुग्णांची सेवा करायला जाई. त्यांच्या पथ्य-पाण्याची व्यवस्था करत असे. ब्राह्मो समाजाच्या विचारांनुसार धर्म, जाती, वर्ण, लिंग यांवर आधारित भेदांवर ब्रजकिशोर यांचा विश्वास नव्हता. मानवता धर्मानुसार प्रत्येक व्यक्ती समान मानण्यावर त्यांची श्रद्धा होती.

तसेच त्यांनी कादंबिनीच्या मनावर बिंबवले होते. कादंबिनी दहा वर्षांची झाल्यानंतर तिला कोलकत्त्याला पाठवून उच्चशिक्षित करावे ,अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. परंतु त्यासाठीच्या खर्चाचा प्रश्र्न होता. कादंबिनीचे आतेभाऊ बॅ. मनमोहन घोष यांनी तो सोडविला. त्यांच्या सहाय्याने कोलकत्ता येथे ब्राह्मो समाजाने चालविलेल्या ‘हिंदू महिला विद्यालयात’ कादंबिनीने प्रवेश घेतला. या विद्यालयात इंग्लंडहून आलेल्या मिस अ‍ॅक्रॉॅइड या निवासी मुख्याध्यापिका आणि द्वारकानाथ गांगुली हे शिक्षक होते. द्वारकानाथांच्या आग्रहामुळे तेथे मुलींना पुरुषांच्या बरोबरीचे शिक्षण दिले जात असे ज्यात गणित, विज्ञान या विषयांचाही समावेश असे. द्वारकानाथांशी गुरू म्हणनू कादंबिनीचा परिचय तेथेच झाला. या शालेय जीवनाचा मार्गही फार सुकर नव्हता. घरापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना लोकनिंदेस तोंड द्यावे लागे. एकदा तर अन्नातून विषबाधा करण्याचाही प्रयत्न झाला.

या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यात कादंबिनीचा पुढाकार असे. त्यावेळी कोलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये महिलांना प्रवेश देण्याची सोय नसल्याने तिने प्रथम कोलकत्ता युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळविण्याचे ठरविले. ती आणि चंद्रमुखी बसू यांनी १८८३ मध्ये प्रथम महिला पदवीधर होण्याचा मान मिळवला. एकीकडे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नही सुरू होते. त्याला यश मिळून १८८३ मध्येच कादंबिनीला तेथे प्रवेश मिळाला आणि पुढे इतर विद्यार्थिनींना वैद्यकीय शिक्षणाचे द्वार खुले झाले.

त्याच वर्षी कादंबिनीचा द्वारकानाथ गांगुलींबरोबर ब्राह्मो पद्धतीने विवाह झाला आणि एका अद्वितीय सहजीवनाची सुरुवात झाली. तिच्या वडिलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न दाखविले तर पती द्वारकानाथ यांनी स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्यास मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले . कादंबिनीला सरकारतर्फे महिना २०रू. शिष्यवृत्ती मिळू लागली. काही प्राध्यापक आणि बरेचसे विद्यार्थी यांना एका महिलेला त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळाल्याने अपमान झाल्यासारखे वाटत असे. महिला आणि डॉक्टर ही कल्पनाच त्यांच्या पचनी पडत नसे.

त्यामुळे तिला सतत त्रास देत. परंतु ती त्यांना पुरून उरली. शिकत असतानाच ती दोन मुलांची आई झाली. तिचे शिक्षणावरचे लक्ष कणभरही ढळले नाही. पती द्वारकानाथ आणि प्रा. डॉ. हॉक यांचा तिला पूर्ण पािंठबा होता. वर्गात प्रथम क्रमांक मिळवण्याऱ्या कादंबिनीला शेवटच्या परीक्षेत एका प्राध्यापकाने मुद्दाम आकसाने तोंडी परीक्षेत नापास केले. या बाबतीत मध्यस्ती करण्यात डॉ. हॉकही असमर्थ ठरले. परिणामी कादंबिनीला पदवी मिळू शकली नाही. तरीही तिला वैद्यकीय व्यवसाय करता यावा म्हणून डॉ. हॉक यांनी त्यांच्या अधिकारात १८८६ मध्ये ईश्वरचंद विद्यासागर यांच्या हस्ते समारंभपूर्वक पदविका प्रमाणपत्र प्रदान केले. त्यामुळे कादंबिनी संपूर्ण आशिया खंडात वैद्यकीय व्यवसाय (अँलोपथी)करणारी पहिली महिला डॉक्टर ठरली.

सामाजिक कामात समरस

संमती-वयाचा कायदा करण्यापूर्वी सरकारने १८९१ मध्ये कादंबिनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या आणि नवीन संशोधनाच्या आधारावर सविस्तर अहवाल बनवून त्यांनी सरकारला सादर केला .केवळ पदवी नसल्यामुळे कमी दर्जाची कामे करावी लागतात असे लक्षात आल्यानंतर इंग्लंडला जाऊन तेथील पदवी घेण्याचे कादंबिनींनी ठरवले. १८९३मध्ये त्या एकट्याच इंग्लंडला गेल्या आणि तीन पदव्या घेऊनच परतल्या. १८९४ मध्ये नेपाळच्या राजमातांवर उपचार केल्यानंतर त्यांची कीर्ती झपाट्याने वाढली. अनेक गरीब रूग्णांवर त्या मोफत उपचार करीत.

वैद्यकीय उपचारांचे त्यांचे कार्य तीन दशके सुरू राहिले. कोलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण करणाऱ्या प्रथम महिला सदस्य त्याच ठरल्या. कष्टकरी महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले. द्वारकानाथ आणि कादंबिनी यांना आठ अपत्ये होती शिवाय द्वारकानाथ यांच्या पहिल्या विवाहाची दोन. द्वारकानाथ ५४ वर्षांचे असताना १८९८मध्ये त्यांचे निधन झाले. द्वारकानाथ-कादंबिनी यांचे पंधरा वर्षांचे अद्वितीय सहजीवन संपुष्टात आले. कादंबिनी एकट्या पडल्या. त्यांचे कार्य मात्र त्यांनी एक दिवसही बंद ठेवले नाही. द्वारकानाथांच्या मृत्यूदिनीही सायंकाळी त्या कर्तव्यपूर्तीसाठी बाहेर पडल्या . कादंबिनीच्या जीवनात द्वारकानाथ यांना गुरू, सखा आणि जीवनसाथी असे स्थान होते.

एकमेकांवरील प्रेम, आदर, संवेदनशीलता आणि बौद्धिक आधार हा त्याचा पाया होता. या अद्वितीय स्त्रीला मृत्यूही तसाच आला. ३ ऑक्टोबर १९२३ रोजी एक कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून सायंकाळी त्या घरी परतल्या. आंघोळ करून येऊन द्वारकानाथांच्या फोटोसमोर खुर्चीवर बसल्या आणि तेथेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी डोळे मिटले. बासष्ट वर्षांचे कृतार्थ जीवन संपले. त्या दिवसाची फी म्हणून मिळालेले. ५० रू. बॅगेत तसेच होते. जणू अंत्यसंस्कारांची तजवीजही त्यांनी करून ठेवली होती...

(लेखिका स्त्री प्रश्र्नांच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com