

Delhi air pollution
esakal
दिल्लीतले वाढते प्रदूषण हा आता दैनंदिन चर्चेचा विषय बनला आहे. दिल्लीच्या प्रदूषणाला धुळीचे साम्राज्य, हवेतील विषारी कण, गलिच्छ यमुना नदी असे अनेक कंगोरे आहेत. थंडीचे दिवस आले की प्रदूषण वाढते. ते रोखण्यासाठी भाजपच्या रेखा गुप्ता सरकारने असंख्य उपाय योजले, मात्र त्यामुळे फार काही फरक पडला नाही. यातच आता आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात आरोपांची सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. तुमच्या-आमच्या काळात काय झाले, हे सांगण्याची जणू अहमहमिका लागली आहे. धूर वाढावा, यासाठी ‘आप’चे नगरसेवक त्यांच्या वॉर्डात कचरा पेटवत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला; तर प्रदूषणामुळे नाताळच्या सणात सांताक्लॉज बेशुद्ध पडला, अशी टीका ‘आप’कडून करण्यात आली. एकीकडे प्रदूषणामुळे आरोग्याचे दिवाळे निघाले असताना दुसरीकडे यावरून सुरू असलेले राजकारण हा किळसवाणा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित तीन शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होतो. श्रीमंतामुळे प्रदूषण पसरत आहे, तर गरिबांना त्याचा त्रास सोसावा लागत असल्याची टिप्पणी खुद्द सर्वोच्च न्यायालयाला करावी लागली होती. प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आपलीही आहे, असे समजून प्रत्येकजण प्रयत्न करणार नाही, तोवर स्थितीत फारसा बदल होण्याची अपेक्षा करता येणार नाही, असेच म्हणावे लागेल.