

Bangladesh Political Crisis 2025
esakal
बांगलादेशात सध्या विविध पातळ्यांवर जे काही घडत आहे ते भीषण आणि चिंताजनक आहे. तितकीच भीषण आणि चिंताजनक बाब आहे ती म्हणजे भारतामध्ये त्यावर उमटली जाणारी त्याबद्दलची प्रतिक्रिया. हे खरे आहे, की बांगलादेशात तेथील अल्पसंख्याक समाजावर (जे हिंदू आहेत त्यांच्यावर) हल्ले होत आहेत. ज्या पद्धतीने दीपुचंद्र दास यांची हत्या करण्यात आली, तो प्रकार अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा भाग आहे. पण हे जर आपण हिंदूंवर मुसलमानांचे हल्ले अशा चौकटीत पाहिले, तर बांगलादेशच्या भूतकाळ आणि वर्तमानाला आकार देणाऱ्या इतिहासातील अनेक बाबींकडे आपण दुर्लक्ष केल्यासारखे होईल.
बांगलादेशचा जन्मच रक्तपात आणि वेदनांच्या पार्श्वभूमीवर झाला. तो जेव्हा पूर्व पाकिस्तान होता आणि १९६९ च्या निवडणुकांत अवामी लीग जिंकल्यानंतरही सत्तांतर न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन झाले, तेव्हा पश्चिम पाकिस्तानने या आंदोलनाचे अत्यंत निर्दयी पद्धतीने दमन केले. त्या काळात पाकिस्तानी लष्कर ढाका विद्यापीठात घुसले, विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या; विविध शहरांत घराघरांत जाऊन स्त्री-पुरुषांना बाहेर काढले; स्त्रियांवर अत्याचार केले; मुलांची हत्या केली. पाकिस्तानी लष्कराच्या या भयावह अत्याचारांचे बळी ठरलेल्यांची संख्या हजारांत नव्हे, तर लाखांत होती. तेव्हा पाकिस्तानी लष्कर या बांगलादेशी लोकांचा धर्म विचारत नव्हते; ते बंगाली बोलणाऱ्यांना शिक्षा देत होते.