

Indian theatre & film journey
esakal
अभिनय आत असतो… त्यासाठी असं शिकायची गरज नाही….असे अनेक जण ठामपणे सांगतात. मग तो आत कुठे असतो असं विचारलं की तो आतला पत्ता सांगता येत नाही. प्रशिक्षित नट तो पत्ता पिनकोड सकट सांगू शकतो, की ‘आत’ म्हणजे नक्की कुठे…
नटरंग सिनेमाच्या सेटवर जेव्हा पोहोचलो तेव्ही ही चर्चा सुरू होती.
‘यातून पंच येईल का…? की हे अतिशय फालतू वाटेल… दर्जा हवा…’ इ. चर्चा चालू होती.
‘नटरंग’ सिनेमातल्या बतावणीसाठी चित्रित होणाऱ्या एका दृश्याची ती तालीम चालू होती. दिग्दर्शक रवी जाधव, अतुल कुलकर्णी आणि प्रामुख्याने नंदू चौगुले हे नट त्या तालमीचा भाग होते. माझा पहिलाच दिवस होता. माझ्या सीनला अजून वेळ होता, तेव्हा मी ही तालीम पाहत होतो. बराच वेळ तालीम चालू होती. दर वेळेस नवीन पद्धतीनं काही गोष्टी नव्यानं येत होत्या. म्हणजे मागची तालीम आणि आत्ता झालेली तालीम यात तफावत होती. सिनेमा आहे… होता… तेव्हा असं रँडम जाणं शक्य नव्हतं. काही तरी फिक्स करावं लागणार होतं… पण ही बतावणी होती… बतावणी उत्स्फूर्त असणं तीचं खास वैशिष्ट्य… बतावणी या तमाशातल्या कलाकाराची ती खासियतच… ती जितकी ताजी, जितकी जिवंत तितकी बतावणी फुलते, सजते… त्यामुळे रवीला निर्णय द्यायचा होता. फिक्स करायचं की शूट करायचं, पुढचं पुढे पाहू… मग अतुलनं मध्यममार्ग काढला, की आपण आणखी काही तालमी करू आणि त्यातलं जे बेस्ट आहे ते ठेवू आणि त्याचं कॅप्सुल हा आपले सीन असेल… यावर एकमत झालं. तालमी झाल्या आणि त्यातलं जे जे उत्तम, पूरक, सर्वसमावेशक होतं, पोषक होतं, गंमत आणणारं होतं ते ठेवलं. त्याचं झालं चित्रीकरण. तो सीन सिनेमात आहे.