
सरकारतर्फे अधिकृतरीत्या सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी म्हणजे गरजूंसाठी एक आशेचा किरण आहे. अजूनही लॉटरीत आपलं भविष्य पाहणारा एखादा हमखास सापडतोच. १९६९ साली सुरू झालेली लॉटरी सध्या तोट्यात असल्याने बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लॉटरी बंद झाल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येणार आहे. आज अनेकांच्या स्वप्नांना राज्य लाॅटरीने पंख दिले आहेत. म्हणूनच ती तगायला हवी आणि सरकारला फायदाही व्हायला हवा.
संजीव साबडे
sanjeevsabade1@gmail.com
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याची शक्यता असल्याची बातमी वाचनात आली. अशी बातमी अधूनमधून नेहमी वाचनात येते. मग लॉटरी विक्रेते राज्य सरकारकडे धाव घेतात. आमच्या, म्हणजे २० हजार लॉटरी तिकीट विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटावर पाय आणू नका, अशी विनंती करतात. लॉटरी तोट्यात सुरू असल्याने ती बंद करावी लागेल, असं सरकारी अधिकारी वा मंत्री त्यांना सांगतात. त्यावर अमक्या राज्यांच्या लॉटरी जोरात सुरू असताना, भरपूर नफा कमावत असताना महाराष्ट्र राज्य लॉटरी तोट्यात कशी काय, असा सवाल विक्रेते विचारतात.
त्याचं उत्तर राज्य सरकारकडे नसतं. मग महाराष्ट्र सरकारची लॉटरी काही काळासाठी मागे पडते. असं साधारणपणे १९९२-९३ पासून सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राची लॉटरी बंद होण्याची चर्चा किमान ३०-३२ वर्षं सुरूच आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होईल, अशी चर्चा ऐकतो वा वाचतो तेव्हा एक चित्र हमखास डोळ्यापुढे येतं...