esakal | दुसऱ्या दिवशी उपवास आहे म्हणून एवढं खाल्लं की जीव गेला..!
sakal

बोलून बातमी शोधा

Adlof fedrik}

दुसऱ्या दिवशी उपवास आहे म्हणून एवढं खाल्लं की जीव गेला..!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

पोटासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. पण, कधी-कधी दोन वेळच जेवण मिळत नसल्याने तो अस्वस्थही झालेला पहायला मिळतो. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक भिकारी आपल्याला रस्त्यावर भिक मागताना दिसतील, तर अनेकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी काहींना काही काम करतच असतात, तेही केवळ पोटासाठीच! त्यामुळे असा कोणताच व्यक्त नाही, की त्याला भूक लागत नाही. भूक मोठी वाईट असते, ती माणसाला काहीही करायला भाग पाडते. म्हणूनच, जिभेवर आणि भूकेवर ताबा मिळवण्यासाठी जगात जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये उपवासाला महत्व दिलंय. अशीच घटना पूर्वी स्वीडनमध्ये घडलीय. स्वीडनचा राजा अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक एक दिवस इतका जेवला, की त्यातच त्याचा मृत्यू झाला. आता राजाचं जेवण म्हणजे अत्यंत शाही असणार यात काहीच शंका नाही. मात्र, असं असतानाही त्या राजाचा कसा मृत्यू झाला असेल, हे एकूण आपल्यालाही थोडं आश्चर्य वाटलं असेल नाही का?, पण हे खरं आहे.

अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक कोण होता?

अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक (14 मे 1710 - 12 फेब्रुवारी 1771) 1751 पासून त्याच्या मृत्यूपर्यंत स्वीडनचा राजा होता. तो ख्रिस्ती ऑगस्ट ऑफ होल्स्टेन-गोटोरप, युटिनचा राजकुमार आणि बाडेन-दुरलाचचा अल्बर्टिना फ्रेडरिकाचा मुलगा होता. अ‍ॅडॉल्फने जवळजवळ 20 वर्षे स्वीडनवर राज्य केलं आहे. अ‍ॅडॉल्फचा जन्म 14 मे 1710 रोजी जर्मनीच्या गोटोरप, स्लेसविंग येथे झाला. 1727 ते 1750 पर्यंत प्रिन्स अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक हे लॅबेकचा राजपुत्र-बिशप होते. त्याचा पहिला चुलत भाऊ चार्ल्स फ्रेडरिक यांचं निधन झाल्यावर, ड्यूकचा अनाथ मुलगा चार्ल्स पीटर उलरिक या अल्पवयीन काळात अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक होल्स्टेन-किलचा प्रशासक बनला. त्यानंतर लगेचच या लहान मुलाला त्याची मावशी, महाराणी एलिझाबेथ यांनी रशियाला आमंत्रित केलं आणि त्याला आपला वारस म्हणून देखील घोषित केलं.

अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक हॅट गटातील स्वीडनच्या सिंहासनाचा वारस म्हणून निवडला गेला. रशियाच्या महाराणी एलिझाबेथकडून एबोच्या करारावर हॅट गटाला अधिक चांगल्या परिस्थितीची जाणीव व्हावी, यासाठी तिनं आपल्या पुतण्यालाच वारस म्हणून स्वीकारलं. 12 वर्षांनंतर 25 मार्च 1751 रोजी तो राजा अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिक म्हणून यशस्वी झाला. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत अ‍ॅडॉल्फने इस्टेटच्या अधिपत्यापासून स्वत: ला मुक्त करण्याचा दोनदा प्रयत्न केला होता.

40 दिवसांचा उपवास

फेब्रुवारी महिन्यात ख्रिश्चन लोकांचा लेन्ट सिझन असतो. लेन्ट म्हणजे ईस्टर पूर्वीचे ४० दिवस उपवास करणे किंवा व्रत पाळणे. या ४० दिवसांत ख्रिश्चन लोक मर्यादित आहार घेतात आणि अनेक गोष्टी आहारात वर्ज्य करतात. येशू ख्रिस्त वाळवंटात ४० दिवस होते त्यांच्या या त्यागाची आठवण म्हणून ख्रिश्चन लोक ईस्टरपूर्वी हे व्रत पाळतात. यात श्रोव्ह ट्यूसडेला खूप महत्त्व प्राप्त आहे. श्रोव्ह ट्यूसडे म्हणजे ऍश वेन्सडे (लेन्टचा पहिला दिवस) च्या आधीच दिवस होय. दुसऱ्या दिवसापासून उपवास असल्याने या दिवशी ते खास जेवण करतात. त्या जेवणात विविध प्रकारचे तिखट आणि गोड पदार्थ असतात. हे जेवण खूपच स्वादिष्ट देखील असतं.

12 फेब्रुवारी 1771 हा श्रोव ट्यूसडेचा दिवस होता. त्यानंतर लेन्ट सिझन सुरु होणार, म्हणून त्या दिवशी प्रथेप्रमाणे एकदम खास जेवण तयार केलं गेलं होतं. राजाच्या जेवणात लॉबस्टर, कॅव्हिअर, विविध प्रकारचे मांस, भाज्या आणि शॅम्पेन असे विविध शाही पदार्थ होते. एखादा सामान्य माणूस इतकं सगळं पदार्थ खाल्ल्यावर समाधानानं जेवण थांबवतो. पण, अ‍ॅडॉल्फ फ्रेडरिकची बातच न्यारी होती. एक कुटुंब आठवडाभर आरामात पोटभर जेवू शकेल इतकं त्याने एकट्याने त्यादिवशी खाल्लं, तरीही त्याचं समाधान झालं नाही. त्याला अजूनही इतक्या जेवणानंतर डेझर्ट खाण्याची इच्छा आणि भूक होती. तो ते पदार्थ खाण्यासाठी बैचेन झाला होता. त्यादिवशी डेझर्ट म्हणून त्याच्या खानसाम्याने ‘सेमला’ नावाची एक खास स्वीडिश पेस्ट्री बनवली होती. राजा खाणार म्हणजे तो पदार्थ शाहीच असायला हवा म्हणून त्याच्या त्या पेस्ट्रीमध्ये बदामाची पेस्ट, विविध प्रकारचा सुकामेवा घातला होता आणि त्यावर भरपूर क्रीम घालून राजाला ती पेस्ट्री खायला दिली होती.

राजा अ‍ॅडॉल्फ हावरट, पण..

पेस्ट्रीसारखा पदार्थ खायचा म्हटलं, तर सामान्य माणूस फार-फार तर एक किंवा दोनच खाईल, पण अॅडॉल्फ राजाने हावरटपणाचा कळस गाठत चक्क चौदा पेस्ट्रीज एकाच वेळेला खाल्ल्या आणि मग ते त्याचं शेवटचं जेवण ठरलं. इतकं खाल्ल्यावर पोट सहन करू शकलं तरच नवल. त्यादिवशी राजानं आपल्या पोटावर अत्याचार केला आणि पचनात भयंकर दोष निर्माण झाल्यामुळे राजा अॅडॉल्फ फ्रेडरिकचा मृत्यू झाला. हा राजा हावरट जरी असला, तरी त्याच्या राज्यात स्वीडिश जनता सुखी होती. त्यांना स्वातंत्र्य होतं. त्याच्या राज्यात पहिल्यांदाच लोकसभेत ‘फ्रिडम ऑफ प्रेस आणि फ्रिडम ऑफ इनफॉर्मेशन’चे कायदे पास झाले होते. जनतेचे नागरी हक्क अबाधित होते. त्यामुळे हा राजा लोकांचा लाडका होता. जाचा अकाली मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा गुस्ताव सत्तेवर आला. तो हुकूमशहा असल्याने जनतेच्या नागरी हक्कांवर गदा आली. त्यानं रशियाबरोबर युद्धही पुकारलं होतं.

go to top