

Drone warfare & geopolitics
esakal
भूषण ओक - bhushanoke@hotmail.com
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाने केवळ भू-राजकारणच ढवळून काढले नाही, तर आधुनिक युद्धाचे स्वरूपही आमूलाग्र बदलून टाकले. याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत आणि त्याचा फटका भारतासारख्या आयात-आधारित देशांनाही बसण्याची शक्यता आहे; पण या संघर्षात सर्वांत जास्त लक्ष वेधून घेतले ते एका नव्या ‘शस्त्राने’- ड्रोनने. कमी खर्चात प्रचंड नुकसान करण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानाने युद्धाचे समीकरणच बदलून टाकले आहे.
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तेल वाहतुकीची नाडी असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद आहे आणि त्याचबरोबर इराणच्या प्रतिहल्ल्यांमुळे आखाती देशांच्या, विशेषतः कतारच्या रास लफान येथील नैसर्गिक वायू प्रक्रिया संयंत्रांचे, बरेच नुकसान झाले आहे. या घडामोडींचा तेलाच्या किमतींवर आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम होण्याची शक्यता वाढत चालली आहे.
भारत तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीसाठी आखाती देशांवर खूप प्रमाणात अवलंबून असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब आहे. अमेरिकेच्या प्रचंड हवाई सामर्थ्यापुढे इराण लवकरच भुईसपाट होईल, असे प्रारंभी वाटले होते. पण, आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊन इराण केवळ टिकून राहिला नाही, तर अमेरिकेच्या आखाती मित्र देशांमध्ये बरेच नुकसान घडवून आणण्यात आणि होर्मुझची नाडी आवळण्यातही तो यशस्वी झाला आणि शेवटी अमेरिकेला वाटाघाटींच्या मार्फत यशस्वी माघार घेणे भाग पडले. ही किमया घडवून आणली आहे ड्रोनच्या अनोख्या युद्धतंत्राने. हे युद्धतंत्र आता खूप चर्चेत आले आले, तरी २०२३ मध्ये हौती दहशतवाद्यांनी लाल समुद्रात व्यापाराची नाकेबंदी करण्यासाठी समुद्री आणि हवाई ड्रोन वापरले तेव्हाच याची सुरवात झाली. हेच ते प्रसिद्ध रेड सी संकट. त्यानंतर २०२५ मध्ये युक्रेनने अत्यंत स्वस्त म्हणजे काही हजार डॉलर किमतीचे ड्रोन वापरून रशियन लढाऊ विमानांचे सात अब्ज डॉलरचे नुकसान घडवून आणले.