
गुलाम आणि शोषकातील भीषण दरी आम्हाला अस्वस्थ करीत होती. वेठबिगारमुक्तीचा आमचा खरा संघर्ष सुरू झाला होता. वेठबिगारी सरकारदप्तरी नष्ट झाली होती; परंतु प्रत्यक्षात नाही, असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. वेठबिगारीच्या मुद्द्यावर माझ्या समाजवादी स्नेह्यांमध्ये आणि आम्ही काम करीत असलेल्या दहिसर गावात आपण एकाकी पडलो आहोत, याची जाणीव आमच्यात प्रखर होत असतानाच बालवाड्या चालवण्यात असंख्य अडथळे आम्हाला येऊ लागले होते. प्रस्थापितांकडून येणारी आव्हानं, संकटं अपेक्षित ठेवून आम्ही शोषणविरहित समाजाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला...
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
दवाखाना, बालवाडी आणि मुलांना शैक्षणिक मदत अशा पद्धतीची कल्याणकारी कामं दहिसरमध्ये ‘विधायक संसद’तर्फे आम्ही सुरू केली तेव्हा गावच्या सामाजिक परिस्थितीचा नेमका आवाका आम्हाला आलेला नव्हता. त्यामुळे समाजासाठी काम करावं, गावाचा विकास करावा अशा ढोबळ कल्पना घेऊन आम्ही दहिसरमध्ये चाचपडत असतानाच सामाजिक आणि आर्थिक विषमतेचं हे भीषण चित्र दहिसरच्या या आठ गड्यांच्या निमित्ताने आमच्यासमोर होतं.
गुलाम आणि शोषकातील ही भीषण दरी आम्हाला अस्वस्थ करीत होती. समाजातील हा काहीतरी गंभीर दोष आहे, इथवर समज एव्हाना आम्हाला आली होती. आम्ही अनुभवत असलेली वेठबिगारीची पद्धत कायद्याने निषिद्ध ठरवली होती, हेसुद्धा आमच्या लक्षात आलं होतं.
मी राष्ट्र सेवादलाच्या आणि समाजवादी विचारांच्या परिवारात वाढलो, त्यामुळे समाजातली अनेक मान्यवर मंडळी माझ्या संपर्कात होती. वसईतील समाजवाद्यांचं समाजात मोठं स्थान होतं. प्राध्यापक वर्टी सर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते.